

पिंपरी : पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. जगताप म्हणाल्या की, मी दर वेळी साहेबांना मतदान करायचे. आज मला स्वतःला मतदान करावे लागले. त्यामुळे थोडीशी हुरहुर वाटली. मतदारांचा आजही माझ्यावर भक्कम विश्वास आहे. तो किंचितही डळमळीत झालेला नाही. मतदार हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी जेवढे होते, तेवढेच माझ्या पाठीशी आहेत. लोकांचे प्रेम आणि सहानुभूती आहे. त्याचप्रमाणे, विकासाचा मुद्दाही या निवडणुकीत महत्त्वाचा ठरला. येत्या 2 तारखेला त्याचा नक्कीच चांगला निकाल येईल.
महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी पिंपळे सौदागर येथील पी. के. इंटरनॅशनल स्कूल या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्या प्रसंगी नाना काटे म्हणाले की, 7 फेब्रुवारीला मी उमेदवारी अर्ज दाखल केला. आमचे मित्रपक्ष अतिशय ताकदीने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आले होते. तो उत्साह आजपर्यंत होता. मतदारांमध्ये देखील तेवढाच उत्साह पाहण्यास मिळाला. सुरुवातीपासून आमची लढत भाजप आणि महाविकास आघाडी अशी दुरंगी राहिली आहे. मतदारांच्या चेहर्यावरील हास्य मला सांगत होते की, येणारा काळ हा आमचाच असेल.
अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी सकाळी सहकुटुंब वाकड गावातील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. कलाटे म्हणाले की, मतदानासाठी वातावरण अतिशय चांगले होते. जागोजागी नागरिक उत्स्फूर्तपणे बाहेर पडत होते. मतदानाला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तिरंगी लढत वगैरे काही नाही. एकतर्फी लढत आहे. ती लढत मी जिंकेल, असा विश्वास आहे.
इच्छुकांचा लेखाजोखा
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात असणार्या उमेदवारांना रविवारी (दि. 26) झालेल्या मतदानाचा मतदान केंद्रनिहाय आणि प्रभागनिहाय लेखाजोखा तपासण्याचे काम भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून करण्यात आले आहे. या तपासणीवरून कोण कोठे कमी पडले, कोणत्या मतदान केंद्रात किंवा प्रभागात किती मतदान झाले, याचा अंदाज बांधला जात आहे. प्रभागनिहाय आणि मतदान केंद्रनिहाय भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून झालेल्या मतदानाची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्या माहितीच्या आधारे विजयाचे दावे देखील केले जात आहेत.