पुणे : समस्यांचा पडदा उघडेना ! लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाची दुरवस्था

पुणे : समस्यांचा पडदा उघडेना ! लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाची दुरवस्था

रघुनाथ कसबे

बिबवेवाडी : पद्मावती येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहाची सध्या दुरवस्था झाली आहे. कोलमडलेली विद्युत व्यवस्था… बंद असलेली स्पीकर यंत्रणा… नादुरुस्त झालेला स्टेजवरील मेन पडदा (कर्टन)… सदोष वातानुकूलित आणि सीसीटीव्ही यंत्रणा… स्वच्छतागृहात बंद असलेले विजेचे दिवे… यासह विविध समस्या या ठिकाणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे रसिक, प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

पिण्याचे पाणीही नाही !
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात काही पंखे बंद पडले आहेत. व्हीआयपी कक्ष, कलादालन व जिन्यातील प्रकाशव्यवस्था तर पूर्णपणे बंद पडली आहे. स्वच्छतागृहांचे कड्या-कोयंडे व आतील भांडी तुटलेली आहेत. तसेच फ्लश आणि नळदेखील नादुरूस्त आहेत. काही नळांना पाणी उपलब्ध नाही, तर काही नळांतून गळती सुरू आहेत. कार्यक्रमासाठी येणार्‍या प्रेक्षकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोयदेखील उपलब्ध नाही. याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात आला असल्याचे नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांनी सांगितले.

तुटलेल्या फरशा अन् पाणी गळती
या सभागृहाचे निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक ठिकाणी कोपरे तुटलेले असून, काही ठिकाणी फरशादेखील निघाल्या आहेत.
टेरेसवरील पाण्याच्या टाक्यांतून गळती होत आहे. पावसाळ्यात छतावरून सतत पाण्याची गळती होत असल्यामुळे पीओपीचा भाग कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

स्वच्छता व देखभालीचा अभाव
या सभागृहाची स्वच्छता व देखभाल करण्यासाठी खाजगी ठेकेदारांचे आठ कर्मचारी आहेत. ते दोन पाळीमध्ये काम करतात. दहा स्वच्छतागृहे, सभागृह, आजूबाजूचा परिसर, व्यासपीठ, स्वच्छतागृहांच्या बाहेरील बाजू यांची संपूर्ण स्वच्छता करण्याचे काम या कर्मचार्‍यांकडे असते. साफसफाई व स्वच्छता करणारे कर्मचारीदेखील खासगी ठेकेदारांचे आहेत. या कर्मचार्‍यांकडून सभागृहाची स्वच्छता व्यवस्थित होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. व्यवस्थापकसुद्धा दोन असून, ते दोन शिफ्टमध्ये काम करतात.

सीसीटीव्ही यंत्रणाही पुरेशी नाही…
या सभागृहामध्ये 36 सीसीटीव्ही पॉईंट आहेत. प्रशासनाने महापालिकेच्या मुख्य खात्याकडे 42 कॅमे-यांची मागणी केली आहे. प्रत्यक्षात केवळ सातच कॅमेरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सीसीटीव्हीच्या अभावामुळे सभागृहात काही अनुचित प्रकार घडला, तर तपासणी करण्यासाठी सध्याची यंत्रणा पुरेशी नाही. यातील काही कॅमेरे बंद आहेत. सभागृहामध्ये प्रवेश करताना कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे सभागृहात कोणी घातक वस्तू अथवा शस्त्र नेले, तर कोणालाच काही कळणार नाही.

सुरक्षारक्षक नेमके कुणासाठी?
हे सभागृह सुरू झाल्यानंतर सुरुवातीला या ठिकाणी महापालिकेने कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली होती. परंतु, त्यानंंतर या ठिकाणी खाजगी ठेकेदारांचे सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. या ठिकाणी नऊ सुरक्षारक्षकांची नियुक्ती असताना प्रत्यक्षात केवळ चार ते पाच जण उपस्थित असतात. त्यांच्याकडूनदेखील सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे, यामुळे हे सुरक्षारक्षक नेमके कुणाच्या फायद्यासाठी आहेत, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहातील विविध समस्यांबाबत आम्ही महापालिकेचे मुख्य खाते, भवन रचना विभाग व सांस्कृतिक विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, संबंधित विभागांकडून अद्याप कोणतेचे उत्तर मिळालेले नाही. यापुढे या विभागांना स्मरणपत्रे पाठविणार आहोत.
                         -संतोष वारुळे, उपायुक्त, नाट्यगृह विभाग, महापालिका

या सभागृहातील विद्युत यंत्रणेतील बर्‍याचशा समस्या आमच्याकडे आल्या आहेत. परंतु, वरिष्ठ अधिकारी पोटनिवडणुकीच्या कामात असल्यामुळे सध्यातरी याबाबत निर्णय घेता येत नाही. निवडणूक झाल्यानंतर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.
                        -दत्ता लाळगे, कनिष्ठ अभियंता, विद्युत विभाग, महापालिका

नाट्यगृहात समस्यांबाबत महापालिकेच्या मुख्य खात्याकडे पाठपुरावा केले जात आहे. या ठिकाणी जनरल विद्युत व्यवस्था उपलब्ध आहे. मात्र, डेकोरेटिव्ह लाईट व साऊंड सिस्टिम यंत्रणा बंद असल्याने कार्यक्रमाच्या आयोजकांना या व्यवस्थेची पूर्तता करावी लागत आहे.
 -प्रदीप दोडके, व्यवस्थापक, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे सभागृह, बिबवेवाडी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news