पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलव्दारे मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणार्या प्रवेश परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया आज (दि.27)पासून सुरू होणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 27 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत https:// cetcell. mahacet. org/ या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती 'सीईटी सेल'कडून देण्यात आली.
'सीईटी सेल'कडून विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेऊन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी एमसीए सीईटी 2023 घेतली जाणार आहे. ही सीईटी परीक्षा राज्यातील आणि राज्याबाहेरील केंद्रांवर घेण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 27फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरून नोंदणी निश्चित करता येणार आहे. परीक्षेची अधिक माहिती माहितीपुस्तिकेत असून, सीईटी सेलच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली. आगामी मार्च ते एप्रिल महिन्याच्या कालावधीत ही परीक्षा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.