पुणे : बेल्हेजवळ टेम्पो- पिकअपची धडक ; अपघातात तिघांचा मृत्यू | पुढारी

पुणे : बेल्हेजवळ टेम्पो- पिकअपची धडक ; अपघातात तिघांचा मृत्यू

बेल्हे : पुढारी वृत्तसेवा : आयशर टेम्पो आणि पिकअपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात सात जण जखमी झाले. नगर- कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि.26) सकाळी साडेसातच्या सुमारास बेल्हे पाण्याची टाकीजवळ हा अपघात झाला. उपचारादरम्यान मृत झालेल्यांमध्ये चंद्रकला रिपुसुदन पांडे (वय 46),अनिता मधुसूदन पांडे (वय 42), रिपुसुदन सर्वज्ञानाथ पांडे (वय 54) यांचा समावेश आहे. मधुसूदन सर्वज्ञानाथ पांडे (वय 61),चांदणी रिपुसुदन पांडे (वय 25),पौर्णिमा मुरलीधर पांडे (वय 20),पल्लवी रिपुसुदन पांडे (वय 17),अपर्णा मुरलीधर पांडे (वय 5), मुरलीधर मधुसूदन पांडे (वय 35, सर्व रा. घणसोली, मुंबई),टेम्पोचालक वसन +जितेंद्र रामसिंग भाई (वय 25) हे जखमी झाले आहेत.अपघातानंतर ग्रामस्थांनी त्यांना आळेफाटा व मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले.

शनिशिंगणापूरहून भीमाशंकरकडे पिकअप (क्र.एम.एच.43,बी.पी.3108) जात होती. दुसरीकडून प्लास्टिक भरलेला टेम्पो (क्र. जीजे 06,बीटी 8911)आळेफाट्याकडून अहमदनगरकडे येत होता. कल्याण-अहमदनगर महामार्गावर बेल्हे गावाजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीसमोर टेम्पो आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात पिकअपचा पूर्ण चक्काचूर झाला. जेसीबीच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी तातडीने हजर झाले. आळेफाट्याचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलिस उपनिरीक्षक अनिल पवार हेही पोलिस कर्मचारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदत केली.

 

Back to top button