पिंपरी : पोलिसांचे मायक्रो प्लॅनिंग; गोंधळ घालण्याच्या तयारीत असलेले 128 जण ताब्यात | पुढारी

पिंपरी : पोलिसांचे मायक्रो प्लॅनिंग; गोंधळ घालण्याच्या तयारीत असलेले 128 जण ताब्यात

पिंपरी : मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी मायक्रो प्लॅनिंग केले होते. रविवारी (दि. 26) गोंधळ घालण्याच्या तयारीत असलेल्या 128 जणांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले. त्यामुळे किरकोळ अपवाद वगळता कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले नाही.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघात येणार्‍या सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 87 मतदान केंद्रांवर 510 बूथवर ही मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रियेसाठी पोलिसांनी अगदी सूक्ष्म नियोजन केले होते. संवेदनशील असलेल्या 18 ठिकाणी पोलिसांनी शस्त्राधारी पोलिस बंदोबस्त लावला होता. तसेच, साध्या वेशातील पोलिस हालचाली टिपत होते.

सर्व प्रमुख अधिकारी तैनात
मतदान प्रक्रियेला गालबोट लागू नये, यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस दलातील सर्व प्रमुख अधिकारी चिंचवड विधानसभेत तैनात करण्यात आले होते. एकूण चार पोलिस उपायुक्त, 7 सहायक पोलिस आयुक्त, 19 पोलिस निरीक्षक, 108 सहायक निरीक्षक/ उपनिरीक्षक, 1084 पोलिस अंमलदार ड्यूटीवर होते. याशिवाय 297 होमगार्ड आणि तब्बल साडेतीनशे विशेष दलाचे जवानांचेही पाचारण करण्यात आले होते.

दहा जणांना केली होती अटक
पोलिसांनी निवडणुकीपूर्वी 10 जणांना अटक केली होतीर, तर 12 जणांना तडीपार केले. यातून पोलिस आक्रमक पवित्र्यात असल्याचा संदेश गुन्हेगारी क्षेत्रात गेला. यातच रविवारी दिवसभरात पोलिसांनी 128 जणांना ताब्यात घेतल्याने विधानसभा कार्यक्षेत्रात शांतता राहिली

काही किरकोळ घटना वगळता मतदान प्रक्रियेला कुठेही गालबोट लागले नाही. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी सूक्ष्म नियोजन केले होते. निकाल जाहीर होईपर्यंत सर्व छोट्या मोठ्या घटनांवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.

                                   – काकासाहेब डोळे, पोलिस उपायुक्त, झोन दोन

Back to top button