पुणे : पैशांचे पाकीट न घेतल्याने मारहाण ; भाजपच्या माजी नगरसेवकासह परस्परविरोधी गुन्हा | पुढारी

पुणे : पैशांचे पाकीट न घेतल्याने मारहाण ; भाजपच्या माजी नगरसेवकासह परस्परविरोधी गुन्हा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ पोटनिवडणुकीत पैशांचे पाकीट न घेतल्यावरून भाजपचे माजी नगरसेवक व त्यांच्या साथीदारांनी एका कुटुंबाला मारहाण केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावरून गंज पेठेत शनिवारी (दि.25) रात्री राडादेखील झाला. मध्यरात्रीपर्यंत दोन्ही गटांतील लोक गंज पेठ पोलिस चौकीसमोर ठाण मांडून बसले होते. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही गटांतील 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल केला. खडक पोलिस ठाण्यात निता शिंदे (वय 42, रा. गंज पेठ) यांच्या तक्रारीवरून विष्णु हरीहर, निर्मल हरीहर, हीरा हरीहर व इतर 15 ते 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, हिरालाल नारायण हरीहर (वय 67, रा. गंज पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विशाल कांबळे, निहाल कांबळे, गोविंद लोंढे, आकाश भोसले, सनी नाईक व इतर 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दाखल गुन्ह्यानुसार, तक्रारदार घरी असताना विष्णु हरीहर तसेच इतर 15 ते 16 जण आले. त्यांनी पैशांचे पाकीट न घेतल्याच्या कारणावरून त्यांचा भाऊ कुणाल यास धक्काबुक्की तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच त्याच्याबरोबर आलेल्या लोकांनी कुणालला मारहाण केली. सावधान मित्र मंडळाच्या मागे मोकळ्या पटांगणात मावशीला मारहाण केली. तक्रारदार सोडविण्यास गेला असता त्यांनाही मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते गंज पेठ पोलिस चौकीसमोर जमले. त्यांनी अ‍ॅट्रासिटीखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पहाटे साडेतीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button