पुणे : ग्रंथालयांच्या सदस्यसंख्येत 15 टक्क्यांनी घट | पुढारी

पुणे : ग्रंथालयांच्या सदस्यसंख्येत 15 टक्क्यांनी घट

सुवर्णा चव्हाण : 

पुणे : सोशल मीडियामुळे सहज उपलब्ध होणारे ई-बुक आणि ऑडिओ बुक, कोरोनामुळे दोन वर्षे बंद असलेली ग्रंथालये अन् आर्थिक निधीची कमतरता, अशा विविध कारणांमुळे राज्यभरातील ग्रंथालयांतील वाचकांच्या सदस्यसंख्येत 15 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे सदस्यसंख्या टिकविण्याचे मोठे आव्हान सार्वजनिक ग्रंथालयांसमोर उभे राहिले आहे. पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, सातारा आदी जिल्ह्यांमधील अनेक ग्रंथालयांच्या सदस्यसंख्येत मोठी घट झाली आहे. सदस्यसंख्येत घट होण्यात कोरोना महामारी हे मोठे कारण असून, सदस्यसंख्या वाढविण्यासाठी ग्रंथालयांकडून घरपोच पुस्तकसेवेसह वाचनकट्टा, व्याख्याने, पुस्तक मेळावे आयोजित केले जात आहेत.

पुणे असो वा मुंबई, प्रत्येक जिल्ह्यातील शहरी असो वा ग्रामीण भागातील ग्रंथालयांच्या सदस्यसंख्येत फरक पडला असून, काही ग्रंथालयांची सदस्यसंख्या 50 हजारांवरून थेट 25 हजार अशी निम्म्यावर पोहचली आहे. सदस्यसंख्या टिकविण्यासाठी आता ग्रंथालयांकडून घरपोच पुस्तकसेवाही सुरू करण्यात आली. परंतु, राज्यभरातील काही ग्रंथालयांना आर्थिक निधीअभावी असे उपक्रम राबविण्यासाठी अडचणी येत आहेत. सोमवारी (दि. 27) साजर्‍या होणार्‍या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दै. ’पुढारी’ने याविषयीचा आढावा घेतला.

याविषयी पुणे मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष धनंजय बर्वे म्हणाले की, सध्या ग्रंथालयाचे 6 हजार 400 सदस्य आहेत. पण, आम्ही सदस्यसंख्या वाढविण्यासाठी अनेक उपक्रम राबवीत आहोत. घरपोच पुस्तकसेवेसह आम्ही सदस्यसंख्या टिकविण्यासाठी जनजागृती करीत आहोत. त्वष्टा कासार समाज संस्था वाचनमंदिराचे आमोद वडके म्हणाले की, आमच्या ग्रंथालयात 70 हजारांहून अधिक पुस्तके आहेत. कोरोनाच्या आधी निश्चितच ग्रंथालयाची 40 हजार हून अधिक सदस्यसंख्या होती. पण, आता सदस्यसंख्या 25 हजारांवर पोहचली आहे. आता हळूहळू सदस्यसंख्येत वाढ होत आहेत.

पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये ग्रंथालयातील सदस्यसंख्या अधिक आहे. पण, ग्रंथालये दोन वर्षे बंद होती. त्याचा परिणाम सदस्यसंख्येवर निश्चितच झाला आहे. राज्यभरातील ग्रंथालयातील सदस्यसंख्येत 15 टक्क्यांनी घट झाली आहे. महाराष्ट्रात साडेबारा हजार नोंदणीकृत सार्वजनिक ग्रंथालये आहेत. त्यांना पुरेसे अनुदान मिळत नाही. अनुदानात वाढ केली पाहिजे.
                           – डॉ. गजानन कोटेवार, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ

 

सदस्यसंख्या कमी होण्याची कारणे
ग्रामीण भागातील ग्रंथालये आर्थिक अडचणीत
ग्रंथालये आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत
ग्रंथालयांचे उपक्रम
घरपोच पुस्तकसेवा वाचन कट्टे आणि वाचक मेळावे
माहिती मोबाईलवर संकेतस्थळावर पुस्तकांची माहिती उपलब्ध

Back to top button