पुणे : मराठी भाषेला अभिजात दर्जा कधी मिळणार? लेखक, साहित्यिकांचा सवाल | पुढारी

पुणे : मराठी भाषेला अभिजात दर्जा कधी मिळणार? लेखक, साहित्यिकांचा सवाल

पुणे : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी प्रत्येक मराठी माणूस वाट बघत आहे. पण, केंद्र सरकारच्या उदासीनतेमुळे मराठी जणांना अजूनही त्यासाठी वाट पाहावी लागत आहे. हा मराठी भाषेवर आणि मराठी जणांवर झालेला अन्याय असून, गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला लढा अजूनही संपलेला नाही. सत्तेवर असलेल्या राज्य सरकारने याबाबत लवकरात लवकर भूमिका घेऊन त्याच्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन विविध साहित्यिकांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त केले आहे.

सोमवारी (दि. 27) साजर्‍या होणार्‍या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठीला अभिजात दर्जा मिळायलाच हवा आणि त्यासाठी साहित्यप्रेमींनी व साहित्यिकांनी एकत्र येऊन पाठपुरावा करावा, असे साहित्यिकांचे म्हणणे आहे.

डॉ. श्रीपाल सबनीस (माजी संमेलनाध्यक्ष) : मराठीला अभिजात दर्जा मिळावा, हा विषय नवीन नाही. अजूनही आपला लढा सुरूच आहे आणि मराठीजन वाट बघत आहेत. केंद्र सरकारला कशाची वाट बघत आहे? हेच कळत नाही. अभिजात दर्जासाठी भीक मागावी लागत आहे, हे चुकीचे आहे.

लक्ष्मीकांत देशमुख (माजी संमेलनाध्यक्ष) : राज्यातील खासदार, काही मंत्री, सर्वपक्षीय नेते आणि दहा ते पंधरा साहित्यिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा. इतर भाषांना अभिजात दर्जा मिळावा, यावर आमचा आक्षेप नाही किंवा हरकत नाही. पण, मराठी भाषेचा विचार प्राधान्याने केला पाहिजे. मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी आता वेळ लावू नये.

प्रा. मिलिंद जोशी (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठीचा लढा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरूच आहे. त्याचा तोडगा अजूनही निघालेला नाही. यासाठी राज्य सरकारनेच इच्छाशक्ती दाखवली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. साहित्य संस्था म्हणून ‘मसाप’ने त्यासाठी लोकचळवळ उभी केली. ’मसाप’च्या शाखांमार्फत 1 लाख पत्रे पंतप्रधान कार्यालयाला पाठवली. दिल्लीत जाऊन आंदोलन केले. बडोद्यात झालेल्या संमेलनात देवेंद्र फडणवीस हे उद्घाटक म्हणून आले होते. तेव्हा त्यांनी साहित्यिकांच्या शिष्टमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घडवून आणण्याचे म्हटले होते. त्याचे स्मरण करण्यासाठीचे पत्र मी नुकत्याच झालेल्या वर्ध्याच्या संमलेनात फडणवीस यांना दिले आहे. त्यावर त्यांनी विचार करावा.

Back to top button