पुणे : कसबा पेठ पोटनिवडणूक : दुपारनंतर वाढली गर्दी; सायंकाळी शुकशुकाट | पुढारी

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणूक : दुपारनंतर वाढली गर्दी; सायंकाळी शुकशुकाट

पुणे : पुढारी वृत्तसेवा :

गुरुवार, गणेश पेठ : 

सकाळी उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. पूर्व भागात सकाळी कमी प्रतिसाद मिळाला. नाना पेठेतील काही मतदान केंद्रावर काहीशी गर्दी होती, मात्र त्या तुलनेत गुरुवार पेठ, गणेश पेठ आणि रविवार पेठेत सकाळी गर्दी नव्हती. या भागातील केंद्रांवर दुपारी तीननंतर मतदानाचा जोर वाढला. तर रविवार पेठेतील अग्रवाल हिंदी हायस्कूलमध्ये सव्वापाच वाजताच शुकशुकाट दिसून आला. कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी प्रमुख पक्षांचे कार्यकर्ते सकाळपासूनच प्रत्येक केंद्राच्या बाहेर उभे होते. संवेदनशील केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, यामध्ये काही बंदूकधारींचा देखील समावेश होता.

उन्हाचा तडाखा वाढल्याने मतदानकेंद्राच्या बाहेर मंडप उभारण्यात आले होते. तर वृद्ध व्यक्ती, दिव्यांग व्यक्तींसाठी प्रशासनाकडून व्हीलचेअर आणि त्यासाठी मदतनीसांची नियुक्ती करण्यात आलेली होती. व्हीलचेअरचा ज्येष्ठांना चांगला फायदा झाला. प्रत्येक केंद्रावर रॅम्पची व्यवस्था असल्याने मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे सहजशक्य होत असल्याचे मतदारांकडून सांगण्यात येत होते. दरम्यान, दुपारपर्यंत रोडावलेली मतदारांची संख्या तर दुपारनंतर मात्र अनेक केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र होते. गणेश पेठेमध्ये डुल्या मारुती चौकातील पंढरीनाथ मोहिते इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये दुपारपासूनच गर्दी होती. परंतु, अपुर्‍या जागेमुळे ज्येष्ठांना त्याचा त्रास झाला. गुरुवार पेठेतील आनंदीबाई कर्वे कन्या शाळेतील केंद्रावर सायंकाळी साडेचार वाजता रांगा बघण्यास मिळाल्या.

नाना पेठ भागातील असलेल्या केंद्रावर देखील अशीच परिस्थिती सायंकाळनंतर बघण्यास मिळाली. पक्षाचे कार्यकर्ते चौका-चौकात थांबून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करत होते. पण, आपल्या उमेदवाराचे आडाखेदेखील बांधत होते. कस्तुरी चौकातील एका ट्रस्टमध्ये असलेल्या मतदान केंद्रावरील आणि मनपा दगडी शाळांमधील केंद्रात मतदारांची रांग साडेपाच वाजता रस्त्यापर्यंत
आली होती.

कसबा, रविवार पेठ
कसबा पेठ मतदारसंघातील संमिश्र असलेल्या कसबा, कागदीपुरा, रास्ता पेठ आणि बुधवार पेठ भागात सकाळी मतदानासाठी तुरळक ठिकाणी मतदार मतदानासाठी आले होते. तीच स्थिती दुपारपर्यंत कायम होती. मात्र, दुपारी तीन वाजल्यानंतर मतदानासाठी रांगा लावल्याचे दिसून आले. बुधवार पेठेतील काही मतदान केद्रांत काही प्रमाणात मतदारांच्या रांगा होत्या. कसबा पेठेतील मतदान केंद्रांवर संथगतीने मतदान होत होते. त्यानंतर दुपारपर्यंत अशीच स्थिती होती.

मतदारांना मतदान केंद्रात आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी कांँग्रेस आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रयत्न करत होते. त्यात काही प्रमाणात यश आले आणि दुपारी तीन वाजल्यापासून बहुतांश मतदान केंद्रांवर गर्दी झाली. कागदीपुरा भागातील मतदार मतदानासाठी समूहाने बाहेर पडत होते. राजमाता जिजाबाई प्राथमिक शाळागृह येथे मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.

आरसीएम गुजराती महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्रात कागदीपुरा आणि कसबा पेठ भागातील मतदारांचा समावेश होता. या केंद्रावर सकाळपासूनच मतदानासाठी मतदार येत होते. पवळे चौकात असलेल्या अब्दुल करीम हुसेन अत्तार प्राथमिक महाविद्यालयात सायंकाळी मोठ्या प्रमाणात मतदारांची रांग लागली होती. या ठिकाणी तीन मतदान केंद्रे होती. त्यातील दोन केंद्रांवर मतदारांची संख्या अधिक दिसून आली.

लोहियानगर, मोमीनपुरा

मुस्लीम-दलित आणि बारा बलुतेदारबहुल लोहियानगर, मोमीनपुरा, घोरपडे पेठ, गंज पेठ या परिसरात सकाळच्या सत्रात अत्यंत धीम्या गतीने सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेला दुपारनंतर चांगलाच वेग आला होता. त्यामुळे दुपारी चारनंतर ते सहापर्यंत बहुतेक मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे काही केंद्रांवर सायंकाळी सात ते साडेसातपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली होती.

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप महायुती आणि महाविकास आघाडीने मुस्लीम-दलित आणि बारा बलुतेदारांची सर्वाधिक संख्या असलेल्या लोहियागर, मोमीनपुरा, घोरपडे पेठ, गंज पेठ येथील मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले. रॅली, पदयात्रांसह मतदारांना प्रलोभने दाखवण्याचेही अनेक प्रकार झाले. मतदान न करण्यासाठीही प्रलोभने दिल्याचे आरोप झाले. पैसे वाटण्याच्या कारणावरून आरोप-प्रत्यारोप व वादही झाले.

या सर्व पार्श्वभूमीवर या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. विनोबा भावे शाळा, सावित्रीबाई फुले स्मारक, सावित्रीबाई फुले प्रशाला, रमाबाई आंबेडकर हॉल, घोरपडी पेठ, महात्मा गांधी विद्यालय, केशवराव जेधे शाळा, इपीफणी इंग्लिश स्कूल आदी केंद्रांवर वेगवेगळ्या बुथवर सकाळी सातपासून मतदान सुरू झाले. पहिल्या दोन तासांत सरासरी 3 टक्के मतदान झाले. त्यानंतर सकाळी 11 पर्यंत 6 ते 7 टक्के मतदान झाले. दुपारी तीनपर्यंत सरासरी 20 टक्के मतदान झाले. त्यानंतर मात्र पुढील तीन तास येथील प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे चारनंतर मतदान केंद्रांच्या परिसरात मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. या रांगा सायंकाळी सहापर्यंत वरचेवर वाढतच गेल्या. विनोबा भावे शाळा मतदार केंद्रावर तर अर्धा किलोमीटर रांग लागली होती. तसेच भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले प्रशालेच्या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या दोन ठिकाणी मतदानाचा कालावधी संपल्यानंतर रांगेतील सर्व मतदारांना आतमध्ये घेऊन मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यानंतर मतदान प्रक्रिया सात ते साडेसातपर्यंत सुरूच होती.

अनेकजण मतदानापासून वंचित
निवडणूक आयोगाने मतदारांना नवीन ओळखपत्रे दिली आहेत. मात्र, ते अनेकांना अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे अनेकजण आपली जुनीच ओळखपत्रे घेऊन मतदान केंद्रावर आले होते. या ओळखपत्रांवरील नंबर व मतदार यादीतील नंबर न जुळल्याने अनेकांना मतदान करता आले नाही.

मतदान झाले, बाहेर व्हा..
मतदान केंद्राच्या परिसरात होणारी गर्दी पोलिस बाजूला करत होते. त्यात येणार्‍या प्रत्येकाला मतदान झाले का, अशी विचारणा करत होते. त्यात ज्यांनी मतदान केले, त्यांना बाहेर जा, अशा सूचना करत होते.

Back to top button