पुणे : पैसे वाटण्यावरून गंज पेठेत मध्यरात्री तुफान राडा | पुढारी

पुणे : पैसे वाटण्यावरून गंज पेठेत मध्यरात्री तुफान राडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  गंज पेठेत मतदारांना पैसे वाटण्यास विरोध केला, म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका कुटुंबास मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. याबाबत पोलिसांकडे परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच विशिष्ट समाजाच्या मतदारांना पैसे देऊन शनिवारी रात्रीच त्यांच्या बोटाला शाई लावून मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोपही केला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महात्मा फुले पेठ (गंज पेठ) येथील लहुजी वस्ताद साळवे तालीम येथे रविवारी पत्रकार परिषद घेत हा आरोप केला. माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर अंकुश काकडे, माजी नगरसेवक अविनाश बागवे या वेळी उपस्थित होते.

बागवे व जगताप म्हणाले, गंज पेठ येथे भाजपचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर व त्यांचे कुटुंबीय शनिवारी दुपारी मतदारांना पैसे वाटत होते. त्याला विशाल कांबळे व अन्य कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्या वेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर शनिवारी मध्यरात्री विष्णू हरिहर तसेच निर्मल हरिहर व हिरा हरिहर यांच्यासह अन्य काही जणांनी गंज पेठेत येऊन विशाल कांबळे यांच्यासह कुटुंबातील महिलांसह अन्य सदस्यांना मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केली. त्याबाबतची तक्रार मीठगंज पोलिस चौकीत दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिसांनी हरिहर यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. ते विविध मतदान केंद्रांवर फिरत आहेत. पोलिस उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली काम करत आहेत, असा आरोप जगताप यांनी केला. लोहियानगर परिसरातील विशिष्ट समाजाच्या मतदारांना पैसे देऊन त्यांच्या बोटाला मतदानानंतर लावण्यात येणारी शाई लावण्यात आली. निवडणूक आयोगाकडील शाई भाजपच्या कार्यकर्त्यांकडे कशी आली, असा सवालही जगताप यांनी केला. तर भाजपने पैसे वाटप करून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा आरोप जोशी व काकडे यांनी केला. दरम्यान, निर्मल व हिरा हरिहर यांनीही विशाल कांबळे, निहाल कांबळे, गोविंद लोंढे, आकाश भोसले, सनी नाईक व अन्य यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

नागरिकांचे आंदोलन
पैसे वाटण्यास विरोध केल्याच्या रागातून भाजप कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप करत 633, महात्मा फुले पेठेतील पावधान वसाहतीमधील नागरिकांनी शनिवारी रात्री 1 वाजता रस्त्यावर येऊन धरणे आंदोलन केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने माजी राज्यमंत्री रमेश बागवे दाखल झाले. त्यानंतर रात्री 2 वाजता जवळपास पाचशे ते आठशे लोकांनी आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी मीठगंज पोलिस चौकीवर मोर्चा काढून चौकीसमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान, या सर्व प्रकारावरून शनिवारी मध्यरात्री गंज पेठेत मोठा राडा झाला, नागरिकांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस चौकीवर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले.

Back to top button