

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गाच्या नव्याने झालेल्या खेड घाट बाह्य वळणावर दुचाकीस्वार चुलत बंधूंना अडवुन ६ युवकांनी जबर मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज लुटला. तसेच युवकांच्या नातेवाईकांना फोन करायला लावुन फोन पे व गुगल पे द्वारे १० हजार व ९८ हजार रुपये त्यांच्या खात्यावर भरायला (ट्रान्स्फर) लावुन लुटल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी (दि. २५) घडला. घाट बाह्यवळण मार्गावर वेहेळदरा हद्दीत रात्री साडेनऊ वाजता घडलेल्या या लुटमार व मारहाणीतील जखमी किरण सुनील गुंजाळ(वय २२, रा. आकुर्डी पुणे, मुळ रा. बेल्हे ता. जुन्नर) यांनी अज्ञात ६ दरोडेखोर युवकांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार किरण व त्यांचे चुलत भाऊ नवनाथ विकास गुंजाळ हे पुण्याकडून पल्सर दुचाकीने गावाकडे चालले होते. रस्त्याने जाताना कट मारल्याचा बहाणा करून दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात सहा दरोडेखोर युवकांनी त्यांना घाटात दोन्ही दुचाकी आडव्या लावून अडवले. सुरुवातीला जवळ आणलेल्या कोयत्याच्या उलट्या बाजूने दोघांच्या हातापयावर मारहाण करून व बंदुक सदृश्य हत्याराने फायरिंग केली.
वाहनांची वर्दळ असल्याने आड बाजूला खोलगट जागी नेले. तेथे या युवकांकडील मनगटी घड्याळ, मोबाईल व एटीएम कार्ड काढून घेतले. त्यांच्याकडे रोख स्वरूपात केवळ ७०० रुपये होते. ते काढून घेतले. त्यांनंतर त्यांच्या मामांना संपर्क साधायला लावुन मोबाईलद्वारे गुगल पे व फोन पे असे ९८ व १० हजार रुपये काढून घेतले. नंतर जवळचे मोबाईल हिसकावून घेत या तरुणांनी पोबारा केला असे तक्रारीत म्हटले आहे.
खेड घाटात रस्त्यालगत रहदारी नाही. मात्र नेहमी वर्दळ असल्याने असा प्रकार यापूर्वी घडला नाही. यापुढे पोलिसांना रात्रीच्या वेळी घाटात सतर्कता बाळगावी लागेल, असे संकेत या प्रकाराने मिळत आहेत. यातील नेमक्या प्रकाराची पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे चौकशी करीत आहेत.
तीन ठिकाणी सारखाच दरोडा
खेड तालुक्यातील वाकी (भाम), खेड घाट तसेच संगमनेर (जि. अहमदनगर) घाटात वेळ बदलुन असा दरोडा घालण्यात आलेला आहे. हे एकाच टोळीचे कृत्य आहे. शिवाय प्रवासी यांच्याकडे पैसे नसताना थेट फोन पे, गुगल पे वर रक्कम घेण्याचा गंभीर प्रकार आहे. पण यामुळे दरोडेखोर तात्काळ जाळ्यात येतील, अशी खात्री आहे.पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. नागरिकांनी रात्री एकट्या वाहनाचा प्रवास टाळावा. मागे-पुढे चालणाऱ्या गाड्यांचा सहवास ठेवावा.
– राजकुमार केंद्रे,
पोलीस निरीक्षक, राजगुरूनगर, खेड