लोणावळ्यात वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा | पुढारी

लोणावळ्यात वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा

लोणावळा : पर्यटननगरी लोणावळा शहरात वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून अंतर्गत वाहतुकीचा अक्षरशः खेळखंडोबा झाला आहे. यामुळे स्थानकांच्या सोबतच येथे येणार्‍या पर्यटकांना मोठया प्रमाणावर वाहतूककोंडी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर, दुसरीकडे लोणावळा नगर परिषद आणि शहर वाहतूक पोलिस प्रशासन मात्र सर्व काही दिसत असताना उघड्या डोळ्यांवर पट्टी बांधून गांधारीच्या भूमिका बजावत आहे.

रस्त्यांवर मनमानी पद्धतीने पार्किंग
पुणे आणि मुंबई यासारख्या दोन महानगरांच्यामध्ये वसलेल्या आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या लोणावळा शहरात खूप मोठ्या संख्येने पर्यटकांची ये-जा सुरू असते. विशेषतः शनिवार, रविवार तसेच सुट्ट्यांच्या दिवसांत येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. जून, जुलै, ऑगस्ट तसेच डिसेंबर या महिण्यातील विकेंडला तर लाखो पर्यटक हजारोंच्या संख्येने वाहन घेऊन येथे हजेरी लावतात.

मुंबई-पुण्यात वाहतूक नियमांचे पालन करीत वाहने चालवणारे चालक मंडळी येथे लोणावळ्यात आल्यावर मात्र अचानक मनमानी करायला लागतात. आपल्याला हवी तिथे, हवी तशी, नो पार्किंग मध्ये वाहन उभं करणं, विरुद्ध दिशेच्या लेनवरून वाहन चालवणं, भर रस्त्यात वाहतुकीला अडथळा ठरू शकेल अशा प्रकारे वाहन उभी करून दुकानात जाऊन खरेदी करणे किंवा हॉटेलमध्ये जाऊन बसणं अशा गोष्टी सर्रास करत असतात. याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होतो, आणि त्याचा त्रास अन्य पर्यटकांच्या सोबत स्थानिकांनादेखील खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो.

रस्त्यांवरील अतिक्रमणात वाढ
खरंतर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहरात पर्यटकांना योग्य सोयीसुविधा पुरवणे तसेच वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे, त्याची अंमलबजावणी करणे, कायदा सुव्यवस्था राहावी ,यासाठी प्रयत्न करणे ही नगर परिषद आणि पोलिस प्रशासनाची प्रथम जबाबदारी आहे. मात्र, आपली जबाबदारी झटकत, सर्व गोंधळ स्पष्ट दिसत असतानाही दोन्ही प्रशासन आपल्या उघड्या डोळ्यांवर पट्टी बांधून आंधळ्याचे सोंग घेऊन बसलेले आहे.

शहरातील अंतर्गत रस्त्यांवर रोजच्या रोज नवनवी अतिक्रमण वाढत आहे. ज्यामुळे येथील रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत चालले आहे. शहरात कुठेही पार्किंग व्यवस्था नाही. ज्या ठिकाणी रुंद रस्ते आहे. त्याठिकाणी नगर परिषदेकडून पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या मोकळ्या जागांचा ताबा अनधिकृत टपर्‍या, हातगाड्या आणि रिक्षा स्टँडवाल्यांची घेतल्याने त्या पार्किंगदेखील बंद झाल्या आहेत.

पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष
शहरातील कुमार हॉटेल चौक ते पुढे शेतकरी पुतळा आणि तेथून नगर परिषद हॉस्पिटल या दरम्यान वाहतूककोंडी ही नित्याची बाब झाली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क केली जातात. बर्‍यापैकी हीच परिस्थिती जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर आहे. ए-वन चिक्की, गोल्डन वडापाव, रामकृष्ण हॉटेल, कुमार हॉटेल, रिगल वाईन याठिकाणी महामार्गाची दोन्ही बाजूकडील प्रत्येकी संपूर्ण एक लेन चुकीच्या पद्धतीने उभ्या करण्यात आलेल्या वाहनांमुळे बंद राहते.

त्यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. पोलीस हे सर्व बघत असतात. मात्र, त्यावर काहीही ठोस उपाययोजना किंवा कारवाई केल्या जात नसल्याने ही समस्या सुटण्याचे नाव घेत नाही. पोलिस बळ कमी असल्याने त्यांना मदतीसाठी पालिकेने पोलिसांना 10 ट्रॅफिक वॉर्डन उपलब्ध करून दिलेले आहे. शिवाय 3 ते 4 होमगार्ड आणि 5 वाहतूक पोलिस असा ताफा असतानाही कारवाई मात्र कुठंच दिसत नाही.

वाहतूक समस्या सोडविण्याची मागणी
वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर कारवाई करणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे या गोष्टी पोलिस प्रशासनाकडून केल्या जाणे अपेक्षित आहे. मात्र, बाहेरून आलेल्या खासगी तसेच परमिटधारक गाड्या अडवणे, त्यांचे पेपर, टुरिस्ट परमिट तपासणं, ओव्हरसीट आहे का हे बघणे, दुचाक्या अडवून लायसन्स तपासणे तसेच, बिल्डिंग मटेरियल वाहतूक करणार्‍या वाहनांवर खास लक्ष ठेवणे याच कामात पोलिस आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणारे ट्राफिक वार्डन प्राधान्यक्रमाने गुंतलेले दिसतात. त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Back to top button