पिंपरी : ईव्हीएम मशिन रात्री दहापर्यंत स्ट्राँग रूममध्ये कुलूपबंद होणार | पुढारी

पिंपरी : ईव्हीएम मशिन रात्री दहापर्यंत स्ट्राँग रूममध्ये कुलूपबंद होणार

पिंपरी : निवडणुकीसाठी रविवारी (दि.26) मतदानप्रक्रिया सायंकाळी सहापर्यंत चालणार आहे. सर्व प्रक्रिया संपल्यानंतर मतदान अधिकारी ईव्हीएम मशिन व साहित्य थेरगाव येथील शंकरअण्णा गावडे कामगार भवन येथील स्ट्राँग रूममध्ये जमा करतील. सर्व 510 केंद्रांवरील ईव्हीएम मशिन जमा होण्यास रात्रीचे दहा वाजण्याची शक्यता आहे.

मतदान सायंकाळी सहाला संपणार आहे. त्यानंतर पोलिंग एजंटसमोर ईव्हीएम सील केले जाईल. ईव्हीएमसह सर्व साहित्य जमा करून ज्या पीएमपीएल बसमधून साहित्य नेले होते, त्याच बसमधून ते थेरगावच्या स्ट्राँगरूमवर नेले जाईल. सर्व 510 केंद्रांवरील ईव्हीएम मशिन ताब्यात येण्यास रात्रीचे दहा वाजणार आहेत.

ते सर्व साहित्य तपासून घेतले जाते. कामगार भवनाच्या तळमजल्यावरील स्ट्रॉग रूममध्ये ते ईव्हीएम मशिन कुलपबंद केले जाणार आहेत.
तेथे अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एकूण 22 सीसीटीव्ही कॅमेरे असून, दोन दरवाजे आहेत. खिडक्या व इतर दरवाजे फ्लायवुड व पत्रे लावून बंद करण्यात आले आहेत. रविवारी रात्री स्ट्राँगरूममध्ये कुलपबंद करण्यात येईल. तेव्हापासून ते गुरूवारी (दि.2) सकाळी आठपर्यंत ते कुलूप उघडले जाणार नाही. मतमोजणीच्या दिवशी गुरुवारी सकाळी आठला स्ट्रॉग रूमचे कुलूप उघडून ईव्हीएम मशिन मतमोजणी कक्षात आणले जातील.

थेरगावला गुरुवारी मतमोजणी
मतमोजणी गुरुवारी (दि.2) होणार आहे. सकाळी आठला मोजणीस सुरुवात केली जाणार आहे. एकूण 14 टेबल असून, 37 फेर्‍यात मोजणी पूर्ण केली जाणार आहे. फेर्‍या अधिक असल्याने अंतिम फेरीची मोजणी पूर्ण होण्यास रात्रीचे आठ वाजण्याची शक्यता आहे, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील यांनी सांगितले.

Back to top button