पुणे: रविंद्र धंगेकरांचे आरोप खोटे; भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीकांचा धंगेकरांवर हल्लाबोल
पुढारी ऑनलाईन: कसबा पेठ मतदार संघात मतदारांनी मतांसाठी पैसे घेतले असा थेट आरोप कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. हा कसबा पेठ मतरदारसंघातील सर्व मतदारांचा अपमान आहे. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, अशी प्रतिक्रिया पुणे शहर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे. भाजपच्या उमेदवारावर खोटे आरोप करुन फक्त सहानुभूती निर्माण करण्याचं काम ते करत असल्याचंही मुळीक म्हणाले.
भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. गोष्टीचा निषेध करण्यासाठी रविंद्र धंगेकर आज कसबा गणपतीसमोर उपोषण करत आहेत. कसबा पेठेतील मतदारसंघातील रविवार पेठ, गंजपेठ आणि बहुतांश भागात भाजपकडून पैशाचे वाटप सुरू केले आहे. यामध्ये पोलिसही सहभागी असल्याचा गंभीर आरोप धंगेकर यांनी केला आहे. त्यानंतर भाजपने हल्लाबोल केला आहे.
जगदीश मुळीक म्हणाले की, काँग्रेसचे उमेदवार धंगेकरांनी मतदारांवर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. कसबा पेठमधील मतदार सुज्ञ आहेत. मतदारांनी मतदानासाठी पैसे घेतले, असे आरोप धंगेकरांनी केले आहेत. असा आरोप करुन धंगेकर हे मतदारांचा अपमान करत आहेत. मतदारांचा हा अपमान भाजप कदापि सहन करणार नसल्याचं ते म्हणाले.
उपोषणाला बसून स्टंटबाजी करुन रविंद्र धंगेकर प्रचार करत आहेत. प्रचार संपला असताना असं काही कृत्य करुन चर्चेत राहण्याचा ते प्रयत्न आहे. भाजप धंगेकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा मुळीक यांनी दिला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी भाजप करणार असल्याचं ते म्हणाले.

