पुणे : पोलिसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर रवींद्र धंगेकरांचं उपोषण मागे | पुढारी

पुणे : पोलिसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर रवींद्र धंगेकरांचं उपोषण मागे

पुणे : काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा मतदारसंघामध्ये भाजपकडून पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत आज सकाळी उपोषणही केले. मात्र पोलिसांनी पैसे वाटणाऱ्यावर कारवाई करणार, असे आश्वासन दिल्यानंतर धंगेकरांनी आपलं उपोषण मागे घेतले आहे.

रवींद्र धंगेकर म्हणाले, कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला काहीच दिवस बाकी असताना पोलिसांच्या उपस्थितीमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्ते लोकांना पैसे वाटप करत आहे. कसबा पेठ, दत्तवाडी, गंजपेठ या भागात पैसे वाटप सुरू आहे. हा सगळा पैसे वाटण्याचा प्रकार पोलिसांसमोर घडत असताना देखील पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहे.

निवडणूक आयोगाला वारंवार तक्रार करूनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. आमच्या कार्यकर्त्यांना धमकावण्यात येत आहे, त्यांना पोलिस स्टेशनमध्ये ठेवले जात आहे. पैसे वाटप करणे हा प्रकार लोकशाहीची हत्या होऊ नये, यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचं धंगेकरांनी सांगितलं. यापुढे असे प्रकार घडू देणार नाही, अशी ग्वाही पोलिसांनी आम्हाला दिली. त्यामुळे उपोषण मागे घेत आहे, असे धंगेकर म्हणाले.

Back to top button