पिंपरी : मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी शास्तीकराचा प्रश्न का नाही सोडविला | पुढारी

पिंपरी : मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी शास्तीकराचा प्रश्न का नाही सोडविला

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील शास्तीकराचा प्रश्न पूर्णपर्ण का सोडविला नाही, असा सवाल उपस्थित करीत, निव्वळ टोलवा टोलवीचा प्रकार त्यांनी केला. सर्व खापर विरोधकांवर फोडण्यास ते माहिर आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.24) केली.

चिंचवड मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर पवार यांनी प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर यांच्या चिंचवड येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत, आघाडीची भूमिका स्पष्ट करीत विजय आपलाच असल्याचा दावा केला. या वेळी आमदार सुनील शेळके, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, योगेश बहल आदी उपस्थित होते.

शास्तीकर राष्ट्रवादीचे पाप आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली होती. त्याला उत्तर देताना पवार म्हणाले की, ते 2014 पासून मुख्यमंत्री होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता 2017 ला भाजपकडे गेली. त्यांनी शास्तीकराचा प्रश्न का सोडविला नाही. अपयशाचे खापर आमच्यावर फोडले जात आहे.

महागाई, बेरोजगारी, शिवसेनेचे नाव व चिन्ह काढून घेणे, कंपन्या पळविणे, शहरातील पाणी व हाऊसिंग सोसायट्यांचे प्रश्न कायम आहेत. सत्ताधार्‍यांच्या मुस्कटदाबीमुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. तो रविवारच्या मतदानावेळी मतपेटीतून बाहेर पडेल. आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात जनतेकडून मिळालेला असा उत्स्फूर्त प्रतिसाद मला यापूर्वी कधीच पहायला मिळाला नव्हता. जनतेनेच ही पोटनिवडणूक हाती घेतली आहे.

राहुल कलाटे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नाहीत
राहुल कलाटे हे शिवसेनेचे उमेदवार नाहीत. त्यांची शिवसेनेने कधीच हकालपट्टी केली आहे. अमक्या व तमक्याला फटका असे चित्र नाही. नाना काटे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. शिवसेनेची सर्व मते आघाडीचे काटे यांनाच मिळतील. तसे, आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आदित्य ठाकरे बॉईक रॅलीत सहभागी झाले होते. सचिन अहिर यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आहे, असे अजित पवार म्हणाले.

Back to top button