आळंदीत मोरांचा अधिवास धोक्यात ; प्लास्टिक व जैव वैद्यकीय कचराही फेकला जातोय | पुढारी

आळंदीत मोरांचा अधिवास धोक्यात ; प्लास्टिक व जैव वैद्यकीय कचराही फेकला जातोय

श्रीकांत बोरावके : 

आळंदी : चाकण वन विभाग हद्दीतील आळंदी परिसरात असलेल्या डोंगरांवर सातत्याने वणवे लागण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच, या ठिकाणी प्लास्टिक व जैव वैद्यकीय कचरा देखील मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. परिणामी, मोरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, त्यांचा अधिवास देखील धोक्यात आला आहे. आळंदी-चाकण रस्त्यावर रोटाई तलाव व घाट परिसरात मोरांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य दिसून येते. गेल्या दोन वर्षांत या ठिकाणी वृक्षांची संख्या वाढल्याने मोरांच्या संख्येत अधिकच भर पडलेली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात सातत्याने वणवे लागण्याचे प्रकार घडत आहेत. दर दोन दिवसांनी येथे वणवे लागल्याचे दिसून येते. वणवे लागतात की लावले जातात, असे देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

याशिवाय या भागात प्लास्टिक व जैव वैद्यकीय कचरा आणून टाकण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मोरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मोरांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. वणव्यामुळे या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत लावलेल्या झाडांचे देखील नुकसान होत आहे. अनेक झाडे आगीत जळून खाक झाली आहेत.

दरम्यान, या ठिकाणी मोरांची संख्या वाढत असताना येथील पक्षिमित्र वन विभागाच्या जागेत मोर सफारी पार्क करावे, अशी मागणी करीत होते. मात्र, सफारी पार्क तर दूरच, येथील वणवे आटोक्यात आणण्यात देखील प्रशासनाला यश येत नसल्याचे चित्र आहे. वन विभागासह स्थानिक प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालणे गरजेचे आहे. वणवे लावणारे व कचरा फेकणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पक्षिप्रेमींकडून होत आहे.

वन विभागाच्या हद्दीत अतिक्रमणही वाढले
वन विभागाच्या हद्दीत वणव्याबरोबरच अतिक्रमण, वृक्षतोड, वन्यजीवांची शिकार व तस्करीचे प्रकार देखील वाढले आहेत. त्यामुळे मोरांना मुक्त संचार करणे देखील अवघड झाले आहे. मात्र, याकडे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे दुर्लक्ष आहे.
दरम्यान, अतिक्रमणाविरोधात ठोस कारवाई होत नसल्यामुळे वन विभागाच्या जागा झपाट्याने बळकाविण्याचे प्रमाण वाढत आहे.

Back to top button