चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : पोलिस यंत्रणा सज्ज.. | पुढारी

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : पोलिस यंत्रणा सज्ज..

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. 26) मतदान होणार आहे. मतदानप्रक्रिया भयमुक्त, निःपक्षपाती व्हावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पिंपरी-चिंचवड पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.

87 मतदान केंद्रे
चिंचवड विधानसभा मतदारसंघात शहर पोलिस हद्दीतील सहा पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. 87 मतदान केंद्रावर 510 बूथवर मतदानप्रक्रिया पार पडणार असून, 18 ठिकाणी संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. या संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त लावला आहे.

मतदारांना विश्वास देण्याचा प्रयत्न
गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे, समाजविघातक कृत्य करणार्‍या, कायदा मोडणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. गुन्हेगारांविरोधात मोहीम राबवून कोम्बिंग ऑपरेशन करून पोलिसांनी बेकायदा शस्त्रे जप्त केली. विविध गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या 10 जणांना अटक केली आहे. मतदारसंघात 24 ठिकाणी 24 तास नाकाबंदी लावली आहे. संवेदनशील ठिकाणी 18 वेळा केंद्रीय पोलिस दलाच्या मदतीने संचलन करून, लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिस दलाकडून करण्यात आला. मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करणार्‍या गुन्हेगारांविषयी माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

356 अग्निशस्त्र जप्त
अग्निशस्त्र परवानाधारक लोक निवडणुकीमध्ये मतदारांवर प्रभाव पाडू शकतील, म्हणून अशा 356 अग्निशस्त्र परवानाधारकांची अग्निशस्त्रे निवडणूक काळात पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. मतदानाच्या अगोदर 48 तास जे राजकीय व्यक्ती चिंचवड मतदारसंघाचे मतदार नाहीत, त्यांनी मतदारसंघात थांबू नये. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळून व्यावसायिक दुकाने व आस्थापना बंद ठेवावीत, असे आदेश पोलिसांनी जारी केले आहेत.

प्रतिबंधात्मक कारवाया
समाजविघातक कृत्यप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई – 677
दारू विक्री – 151
अंमली पदार्थ विक्री – 3
अग्निशस्त्रे – 19
कोयता, तलवार-  81
पाहिजे आरोपी अटक – 10
तडीपार – 12

संवेदनशील मतदान केंद्र

  • महापालिका शाळा, थेरगाव
  • द गुड सॅमरिटन शाळा, वाकड
  • महापालिका शाळा, पिंपळे सौदागर
  • गुरूगणेश बालक मंदिर, चिंचवड
  • फत्तेचंद जैन विद्यालय/ महाविद्यालय, चिंचवड

सुट्ट्या बंद
अपुर्‍या मनुष्यबळामुळे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सर्व पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सुट्ट्या बंद केल्या आहेत. रविवारी साप्ताहिक सुटी असलेल्या पोलिसांनी इतर दिवशी सुटी घ्यावी, असे आदेशात नमूद आहे.

पोलिस बंदोबस्त
4-पोलिस उपआयुक्त                                                                                                                                                          7- सहायक पोलिस आयुक्त
19-पोलिस निरीक्षक
108-सहायक निरीक्षक/ उपनिरीक्षक
1084-पोलिस अंमलदार
297-होमगार्ड
20-केंद्रीय औद्योगिक दल
90-इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स
60-केंद्रीय राखीव पोलिस दल
180- रेल्वे पोलिस

Back to top button