पुणे : विमानतळाबाहेरील पथदिवे बंद | पुढारी

पुणे : विमानतळाबाहेरील पथदिवे बंद

येरवडा : पुढारी वृत्तसेवा : विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून ते फाइव्ह नाईन चौकापर्यंतच्या रस्त्यावरील पथदिवे गेल्या अनेक दिवसापासून बंद आहेत. जी-20 परिषदेसाठी महापालिकेने केलेला झगमगाट इतक्या लवकर विझेल असे वाटले नव्हते, असे नागरिकांनी सांगितले. विमानतळावरून पुण्यात येणार्‍या-जाणार्‍या राजकीय नेत्यांना आणि व्हीआयपी पाहुण्यांना रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून अंधारातच प्रवास करावा लागत आहे. जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळाबाहेरील रस्ते, चौक व भिंती सजविण्यात आल्या होत्या. तसेच रस्त्यांवर पथदिवे बसविण्यात आले होते.

ठिकठिकाणी एलईडी लाईटही बसविण्यात आले आहेत. मात्र, हा केवळ दिखावा असल्याचे आता समोर आले असून, गेल्या अनेक दिवसांपासून विमानतळाचे प्रवेशद्वार ते फाइव्ह नाईन चौकापर्यंतचे पथदिवे बंद आहेत, यामुळे या रस्त्यावर सध्या अंधार आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रवासी व नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. याबाबत नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील विद्युत विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांशी संपर्क केला असता, प्रतिसाद मिळू शकला नाही.

 

Back to top button