पिंपरी : आता छुपा प्रचार? सोशल मीडियावर कार्यकर्ते सक्रिय | पुढारी

पिंपरी : आता छुपा प्रचार? सोशल मीडियावर कार्यकर्ते सक्रिय

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शुक्रवारी (दि.24) सायंकाळी थांबला. आता छुपा प्रचार सुरू झाला आहे. स्थानिक नेतेमंडळी, पदाधिकारी, माजी नगसेवक, मंडळ, संस्था, संघटना, हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष व पदाधिकार्‍यांच्या गुप्त भेटी घेऊन किंवा मोबाईलवर संपर्क साधून त्यांचे ‘समाधान’ केले जात आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची स्वतंत्र फळी तैनात करण्यात आली आहे. जाहीर प्रचार संपल्याने उमेदवारांसह नेतेमंडळी, कार्यकर्ते व समर्थक थोडे रिलॅक्स झाले आहेत.

मात्र, ठरलेल्या रणनितीनुसार विरोधकांकडील मते फोडण्यासाठी तसेच, काठावरील मतदारांसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. मतदार संघातील प्रभावी नेतेमंडळी, पदाधिकारी, माजी नगरसेवक, सामाजिक व प्रतितिष्ठीत व्यक्ती, समाज व सार्वजनिक मंडळ, संस्था, संघटना, कॉलनी आणि हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्ष व पदाधिकार्‍यांसोबत बंद दाराआड चर्चा होत आहेत. ठराविक ठिकाणी या बैठका होत आहेत. मतदार संघाबाहेरील ठिकाणीही बैठकांचे सत्र सुरू आहे. येणे जाणे शक्य नसल्यास व्हिडिओ कॉन्फरन्स व मोबाईलवर चर्चा होत आहे.

उमेदवारांनी प्रत्येक भागांसाठी आपले खास प्रतिनिधी नेमले आहेत. त्या व्यक्तीसोबत चर्चा करून समाधानकारक तोडगा काढला जात आहे. आश्वासन व वचन दिल्यानंतर समेट घडवून आणला जात आहे. त्यानंतर उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी दुसर्‍या भागांवर लक्ष केंद्रीत करीत आहेत. असा प्रकार रात्री उशीरापर्यंत सुरू होता.

तसेच, सोशल मीडियावर विजयी करण्याचे संदेश पाठविले जात आहेत. विजयाचे दावे केले जात आहेत. उमेदवार व नेत्यांचे रेकॉर्ड केलेले कॉल मतदारांना येत आहेत. तर, दुसरीकडे, निवडणूक विभागाच्या पथकांकडून छुप्या प्रचारावर बारिक लक्ष आहे. तसेच, रोख रक्कम आणि दारूची वाहतूक करणार्‍या संशयित वाहनांची रात्रभर कसून तपासणी करण्यात येत होती. तसेच, घोळक्याने फिरणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून हटकले जात होते.

पथकांकडून रोकड, दारू, गांजा जप्त
निवडणुकीमुळे मतदारसंघाच्या सीमेवर चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. तेथे संशयित वाहनांची तपासणी केली जाते. त्या तपासणीत रोख रक्कम, विविध बॅण्डची देशी व विदेशी दारू तसेच, गांजा जप्त करण्यात आला आहे.

Back to top button