पुणे : जंक्शनच्या अपघातातील चारचाकीचा शोध लागला, चालकाला केली अटक | पुढारी

पुणे : जंक्शनच्या अपघातातील चारचाकीचा शोध लागला, चालकाला केली अटक

जंक्शन : पुढारी वृत्तसेवा :  संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर जंक्शन (ता. इंदापूर) येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांना धडक देऊन पळून गेलेल्या चालकाला वालचंदनगर पोलिसांनी लातूर येथून अटक केली. त्याच्याकडून अपघातातील वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी विकास तुकाराम गुरमे (रा. लातूर) याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर भारतीय दंड संहिता 304 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमध्ये अर्चना श्रीशैल सनमठ व अनिता शिवाजी शिंदे (रा. दोघीही आनंदनगर) यांचा बुधवारी (दि. 22) मृत्यू झाला होता. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 21) रात्रीच्या सुमारास गुरमे हा ओमनी गाडी घेऊन लातूरहून बारामतीला मुलाला भेटायला निघाला होता. बुधवारी (दि. 22) सकाळी सहा वाजेच्या सुमारास जंक्शनजवळ डुलकी लागल्यामुळे भरधाव वेगाने जाणार्‍या गाडीने अर्चना सनमठ व अनिता शिंदे यांना पाठीमागून जोरदार ठोस दिली. या अपघातानंतर गुरमे पाच ते सहा मिनिटे थांबून लातूरला परत गेला.

अपघातानंतर पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही तपासणी सुरू केली. अपघात झालेल्या ठिकाणापासून जवळ असलेल्या किराणा मालाच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये सनमठ व शिंदे या महिला हातामध्ये बॅटरी घेऊन चालत जाताना दिसत होत्या. थोड्या वेळाने एक ओमनी गाडीही रस्त्याने गेलेली दिसली. मात्र, तिचा नंबर दिसत नव्हता. पोलिसांनी गाडीचे फोटो व्हायरल करून नागरिकांना संपर्क करण्याचे आवाहन केले. सरडेवाडीच्या टोलनाक्यावरील सीसीटीव्ही तपासणी केल्यानंतर अपघात करून चाललेली गाडी दिसल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे संबधित चालक व गाडीला ताब्यात घेतले. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगरचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे, दादासाहेब डोईफोडे, गुलाब पाटील यांनी गाडीचा शोध घेतला.

Back to top button