पुणे : कसब्याची निवडणूक जनतेच्या हातात : रवींद्र धंगेकर ; महाविकास आघाडीच्या रॅलीला प्रतिसाद | पुढारी

पुणे : कसब्याची निवडणूक जनतेच्या हातात : रवींद्र धंगेकर ; महाविकास आघाडीच्या रॅलीला प्रतिसाद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी (दि. 24) महाविकास आघाडीकडून मतदारसंघात प्रचार रॅली काढण्यात आली. तीनही पक्षांचे झेंडे, फटाक्यांचा दणदणाट, घोषणा, दुचाकी घेऊन आलेल्या तरुण-तरुणी आणि फुलांच्या वर्षावात जागोजागी होणार्‍या स्वागताने रॅली पार पडली. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी लोहियानगर पोलिस चौकीपासून सकाळी साडेदहा वाजता रॅलीला सुरुवात झाली. उमेदवार धंगेकर हे जीपमध्ये बसून लोकांना अभिवादन करीत असताना सर्वसामान्य नागरिक, व्यापारी व दुकानदार यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता. ‘रवींद्र धंगेकर आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिक पुष्पगुच्छ व शाल देऊन धंगेकर यांचे स्वागत करण्यासाठी उभे होते.

घोरपडी पेठ पोलिस चौकीजवळ रॅली आल्यानंतर धंगेकर यांचे स्वागत करणारी रांगोळी काढण्यात आली होती. तेथून पुढे सिटी पोस्ट, हिराबाग चौक, एस. पी. कॉलेज, गांजवे चौक, दत्तवाडी म्हसोबा चौक, शनिवारवाडा, कामगार मैदान, साखळीपीर तालीम चौक, पांगुळ आळी आणि स्वामी समर्थ मठ येथे रॅली आल्यानंतर तिथे समाप्ती करण्यात आली. या रॅलीमध्ये काँग्रेस पक्षाचे माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, अभय छाजेड, अविनाश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे आदी सहभागी झाले होते.

कसब्याची निवडणूक जनतेच्या हातात : रवींद्र धंगेकर

‘आम्ही प्रचाराची पातळी सोडलेली नाही. भाजपकडून शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करण्यात आला. कसब्यातील वाड्यांच्या प्रश्नांचे दीर्घकालीन नियोजन करण्याचा प्रयत्न करू. राज्य शासनाच्या माध्यमातून आपण तो प्रश्न सोडवणार आहोत. भाजपच्या कामकाजाविषयी मतदारसंघात असलेली तीव्र नाराजी दिसली. ही पोटनिवडणूक जनतेनेच आपल्या हातामध्ये घेतली आहे,’ असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी शुक्रवारी (दि. 24) पत्रकार परिषदेत केले. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काढलेल्या शेवटच्या रॅलीनंतर पत्रकार परिषद आयोजित केली गेली. या वेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी आदी उपस्थित होते.

धंगेकर म्हणाले, ’विजयी झाल्यानंतर सर्वप्रथम दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांची अर्धवट राहिलेली सर्व कामे पूर्ण करणार आहे. ’कसबा विकास परिषदे’चे आयोजन करून कसब्याच्या विकासाची पाच वर्षांची ’ब्ल्यू प्रिंट’ तयार करणार असून, त्यातील दीड वर्षात करायच्या तातडीच्या कामांवर भर देणार आहे. भाजपाला 30 वर्षे संधी असूनही त्यांचे कसब्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले. मागील काही दिवसांपासून भाजपाचे मोठे नेते प्रचारात उतरले आहेत. कसब्याचा विकास केला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती.’
हाताच्या बोटातील सोन्याच्या अंगठीपेक्षाही मतदानानंतरचा बोटावरील काळा ठिपका जास्त मौल्यवान आहे. या आमच्या आवाहनाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही ते म्हणाले.

Back to top button