पिंपरी : कर्मचार्‍यांना ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण | पुढारी

पिंपरी : कर्मचार्‍यांना ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी येत्या रविवारी (दि. 26) 510 केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदानासाठी इलेक्ट्रानिक व्होटींग मशिनचा (ईव्हीएम) वापर केला जाणार आहे. मतदान केंद्राध्यक्षांसह इतर कर्मचार्‍यांना ईव्हीएम यंत्र हाताळणीचे प्रशिक्षणासह प्रात्यक्षिक देण्यास थेरगाव येथील निवडणूक कार्यालयात गुरुवारी (दि.23) सुरुवात करण्यात आली. प्रशिक्षण शुक्रवारी (दि.24) सायंकाळी पाचपर्यंत सुरू राहणार आहे. त्याची पाहणी निवडणूक निरिक्षक एस. सत्यनारायण यांनी केली. अशिक्षित, वयोवृद्ध, नवोदित मतदारांना ईव्हीएमद्वारे मताधिकार बजावताना कोणत्याही अडचणी येऊ नये, या दृष्टीने उपक्रमात माहिती दिली जात आहे. आपले मतदान झाले आहे की किंवा नाही, आपले मतदान आपण दिलेल्या उमेदवारालाच झाले आहे किंवा कसे याबाबत या उपक्रमामध्ये सविस्तर माहिती दिली जात आहे.

निवडणूक कामकाजासाठी नेमलेल्या अधिकारी कर्मचार्‍यांना ईव्हीएम हाताळणीचे तसेच, मतदान प्रक्रियेवेळी मशीन सीलबंद करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण दिले जात आहे. ईव्हीएमची पाहणी नागरिकांना सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत करता येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

मतदान प्रक्रियेबाबत आढावा
येत्या रविवारी (दि.26) सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होत आहे. त्या अनुषंगाने कामकाज तसेच, 510 मतदान केंद्र आणि थेरगाव येथील मतमोजणी केंद्र या ठिकाणी देण्यात येणार्या सोयीसुविधांचा आढावा निवडणुक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी गुरूवारी घेतला. मतदान केंद्रावर आवश्यक सर्व सुविधा, मतदान साहित्य, टेबल, खुर्च्या, इतर फर्निचर, विद्युत व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था आदींबाबत ढोले यांनी आढावा घेतला. एकाच जागी दोन मतदान केंद्र असल्यास तेथे योग्य दुभाजक व्यवस्था उभारताना आवश्यक सर्व काळजी घ्यावी.

मतदान साहित्य वाटप आणि स्वीकृतीचे काम चोखपणे करावे, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मतदारांशी सौजन्याने वागावे, मतदान केंद्रावर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन होईल याची खबरदारी घ्यावी, कायदा सुव्यवस्थतेचा प्रश्न उद्भवल्यास त्वरित पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा, अशा सूचना ढोले यांनी दिल्या. बैठकीस निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, निवडणूक सहायक नागेश गायकवाड, प्रशांत शिंपी, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी बापू गायकवाड, थॉमस नरोन्हा, टपाल कक्ष समन्वय अधिकारी राजेश आगळे, किरण गायकवाड, संतोष सोनवणे यांची उपस्थित होते.

Back to top button