पिंपरी : महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून थकीत मिळकतकर वसुली मोहीम तीव्र | पुढारी

पिंपरी : महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून थकीत मिळकतकर वसुली मोहीम तीव्र

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून थकीत मिळकतकर वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. वसुली पथकातील कर्मचारी व एमएसएफच्या जवानांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे.

थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणार
एक एप्रिल 2022 पासून अद्याप 350 कोटी रुपयांचा मिळकतकर नागरिकांनी भरलेला नाही. आतापर्यंत जवळपास 3 लाख 60 हजार मिळकतधारकांनी कराचे संपूर्ण बिले भरली आहेत. अडीच लाख मिळकतधारकांकडे अंशता वा पूर्ण कराची थकबाकी आहे. 31 मार्च संपण्यास कमी दिवस असल्याने वसुली मोहीम कडक करण्यात आली आहे. पाच हजार जणांना नव्याने नोटीस काढण्यात आल्या आहेत. ज्या मिळकतधारकांकडे चार वर्षांपेक्षा जास्त काळापासून मिळकतकराची थकबाकी एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा मालमत्ताधारकांची नावे वर्तमानपत्रासह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. थकबाकीदारांची नावे सोमवारपासून (दि.27) विविध दैनिकात प्रसिध्द केली जाणार आहेत.

दोनशेपेक्षा जास्त मिळकतीचे नळजोड तोडले
या थकबाकीदारांमध्ये निवासी तसेच, कंपनी, संस्था, व्यावसायिक आदींचा समावेश आहे. बिगरनिवासी मालमत्तांची जप्ती कारवाई करण्यात येत आहे. निवासी मिळकतीचे नळजोड खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. आता, राहत्या घराच्या जंगम मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. आतापर्यंत तब्बल सहाशेपेक्षा जास्त मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. दोनशेपेक्षा जास्त मिळकतीचे नळजोड तोडण्यात आले आहे.

करसंकलन विभागाचे एकूण 17 झोन आहेत. सर्व झोनमध्ये वसुली मोहीम तीव— केली आहे. चिखली, चिंचवड, वाकड, थेरगाव या मोठ्या झोनमध्ये असणार्‍या वसुली पथकामधील कर्मचारी संख्या, एमएसएफ जवानांची संख्या वाढविण्यात आली आहे.
थकबाकीदारांना आता सवलत नाही करसंकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात 1 हजार कोटींचे टार्गेट ठेवले आहे. 31 मार्च 2023 पर्यंत केवळ 35 दिवसांत तब्बल 355 कोटींच्या वसुलीचे लक्ष विभागापुढे आहे. वारंवार आवाहन करूनदेखील मोठे व्यावसायिक, कंपन्या थकीत मिळकतकर भरण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे विभागाने आता वसुली मोहीम कडक केली आहे. आता कोणत्याही संस्था, कंपन्या, थकबाकीदारांबाबत पालिकेकडून सहिष्णुता दाखविण्यात येणार नाही, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

35 दिवसांत 355 कोटींचे वसुलीचे आव्हान
2022-23 या आर्थिक वर्षात मिळकतकर वसुलीचा उच्चांक गाठण्यात आला आहे. आजपर्यंत एकूण 645 कोटी भरणा व वसुली झाली आहे. गेल्यावर्षी 31 मार्चला 632 कोटी वसुली झाली होती. या वर्षी 1 हजार कोटींचे टार्गेट आहे. त्यामुळे केवळ 35 दिवसांत तब्बल 355 कोटींच्या वसुलीचे आव्हान करसंकलन विभागासमोर आहे.

Back to top button