पिंपरी : आज सायंकाळी सहानंतर प्रचार केल्यास कारवाई | पुढारी

पिंपरी : आज सायंकाळी सहानंतर प्रचार केल्यास कारवाई

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. 26) मतदान होणार आहे. प्रचाराची मुदत शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी सहाला संपत आहे. त्यानंतर प्रचार करणारे राजकीय पक्ष, व्यक्ती, संघटना व उमेदवारावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी गुरुवारी (दि. 23) दिला आहे. मतदान संपणाच्या 48 तास अगोदर प्रचाराचा कालावधी संपतो. त्यामुळे मतदार संघाबाहेरून आलेले, त्या मतदारसंघाचे मतदार नसलेले राजकीय नेत्यांनी चिंचवड मतदार संघात उपस्थित राहू नये.

अशा नेत्यांनी प्रचाराचा कालावधी समाप्त होताच मतदार संघ सोडावा. त्या मतदारसंघाचे मतदार नसले तरी सुद्धा उमेदवार किंवा त्याचा निवडणूक प्रतिनिधी यांना ही बाब लागू होणार नाही. केवळ निवडणुकीच्या कालावधीत राज्याचा प्रभारी असलेल्या पदाधिकार्याच्या बाबतीत अशा निर्बंधाचा आग्रह धरला जात नाही. असे पदाधिकारी पक्ष कार्यालय आणि त्याचे राहण्याचे ठिकाण यापुरतीच मर्यादित राहील. उमेदवाराना शुक्रवारी सायंकाळनंतर 48 तासांच्या कालावधीत कोणत्याही जाहीर सभा व मिरवणुका आयोजित करता येणार नाहीत. तसेच मतदान संपेपर्यंत प्रसारमाध्यमांना जनमत चाचणी प्रसारित करता येणार नाही. नियमाचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे ढोले यांनी सांगितले. त्यांनी पोलिस यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

झेंडे, जाहिराती काढून घ्यावेत
कोणत्याही जाहिराती किंवा प्रायोजित कार्यक्रम घेता येणार नाही. एखाद्या इराद्याने उमेदवाराला पाठिंबा देणारे किंवा टीका करणारे तसेच, निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकणारा कोणताही अहवाल वितरीत करता येणार नाही. प्रचारासाठी लावण्यात आलेले फ्लेक्स, झेंडे, जाहिराती संबंधित उमेदवाराने काढून घ्यावेत. कोणत्याही प्रकारे वाहनांद्वारे प्रचार करण्यास बंदी आहे.

Back to top button