कुरकुंभ घाटातील रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त | पुढारी

कुरकुंभ घाटातील रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त

कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ घाटातील रखडलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे घाट रस्त्यावरील दगड, माती, फुफाट्याने प्रचंड त्रस्त झालेल्या वाहनचालकांसह प्रवाशांची सुटका होणार आहे.
दौंड-कुरकुंभ-बारामती रस्त्यावरील कुरकुंभ घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली होती. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम बंद होते. रखडलेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

दगड, खडी, माती व धुळीने अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. वाहनांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, घाटातील भूसंपादन प्रक्रियेकडे रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भूसंपादन विभागाने दुर्लक्ष केल्याने बाधित शेतकर्‍यांनी रुंदीकरणास विरोध केला. परिणामी आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. रस्त्याला आमचा विरोध नाही. मात्र, आधी मोबदला द्या आणि मग रस्ता करा, अशी बाधित शेतकर्‍यांची भूमिका होती. पुढे बाधित शेतकरी व प्रशासनाचा वाद मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाला.

घाटातील खडी मशिन ते एमआयडीसी कॉलनी यादरम्यान साधारण 1 किलोमीटरपर्यंतचे काम रखडलेले आहे. याबाबतचा अंतिम निर्णय झाला नाही. मात्र, ज्या भागात मार्ग निघाला आहे. तिथे आता काम सुरू करण्यात आले आहे. जिथे निर्णय झाला नाही अशा ठिकाणी वाढीव रस्ता होण्याची शक्यता कमी आहे. सध्या खडी मशिन ते घाटाचा शेवटचा चढ इथपर्यंत काम सुरू आहे.

Back to top button