सासवड : सोनोरीत देशातील पहिला ‘हंसा’ प्रकल्प सुरू | पुढारी

सासवड : सोनोरीत देशातील पहिला ‘हंसा’ प्रकल्प सुरू

सासवड(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : शालेय मुलांना पोषणयुक्त अन्नपुरवठासाठी हार्वेस्ट प्लस, हॅप्पल फाउंडेशन यांनी ‘हंसा हेल्थ अँड न्यूट्रिशन फोर स्कूल अँड चिल्ड्रेन’ हा प्रकल्प मंगळवारी (दि.21) सोनोरी जि. प. शाळेत सुरू केला. देशातील पहिल्याच प्रकल्पाचा शुभारंभ हार्वेस्ट प्लसचे, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बराल यांच्या हस्ते झाला.

हंसा या शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रमास प्रारंभ जानेवारीपासून झाला. प्रकल्प पुढील दोन महिन्यांपर्यंत आहे. पौष्टिक आहाराचा दैनंदिन पुरवठा व आरोग्याची काळजी, पौष्टिक अन्न कसे असावे, इत्यादी गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी आरोग्य शाळा उभारण्यात आली. शाळेत विद्यार्थ्यांसाठी रंगीबेरंगी चित्रे व त्यावरील आरोग्यदायी संदेश काढले होते. हंसा या प्रकल्पांतर्गत शाळेमध्ये पुढील तीन महिने लोहयुक्त बाजरीपासून बनवलेले पदार्थ दररोज विद्यार्थ्यांना देणार आहे.

महिला बचत गट व अ‍ॅग्रोझी ऑरगॅनिक प्रा. लि. ही कंपनी शालेय आहारात भरड धान्यांपासून बनवलेले पदार्थ देत आहे. प्रकल्पाचा लाभ साधारण दोन दशलक्ष मुलांना मिळेल. उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही अनेक शाळांमध्ये उपक्रम राबवण्यास तयार आहोत, असे वक्तव्य हार्वेस्ट प्लसचे सी.ई.ओ.अरुण बराल यांनी केले.

या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी हर्वेस्ट प्लस, अरुण बराल, गट विकास अधिकारी अमर माने, रवींद्र ग्रोवर, स्वाधीन पटनायक, प्रतीक अनियाल, शेफ नताशा गांधी,अ‍ॅग्रोझीचे संस्थापक महेश लोंढे, मुख्याध्यापिका मनीषा सुरवसे, सरपंच भारत मोरे, सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या मुख्य डॉ. राधिका हेडाव व संचालक डॉ. संमिता जाधव, डॉ. कविता मेनन आदी
उपस्थित होते.

Back to top button