पुणे : स्पर्धेत दुधाच्या पाऊच पॅकिंग उत्पादकांचे भवितव्य अधांतरी | पुढारी

पुणे : स्पर्धेत दुधाच्या पाऊच पॅकिंग उत्पादकांचे भवितव्य अधांतरी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात दुधाचे खरेदी-विक्री दरात नुकतीच वाढ करण्यात आली असून, ग्राहकांवर सातत्याने बोजा टाकण्यावरून दुग्ध उद्योगातील पाऊच पॅकिंग उत्पादकांचे भवितव्य अधांतरी आहे. त्यातील अडचण दूर करण्यासाठी डिलर दर ते ग्राहक दर यामधील जास्त अंतराची तफावत कमी केल्याशिवाय महाराष्ट्रातील पाऊच पॅकिंगमधील दूध उद्योगास बळकटी येणार नसल्याचे मत व्यक्त होत आहे. तसेच स्पर्धेच्या काळात टिकून राहण्यासाठी सांघिक निर्णयच होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात मदर डेअरी, अमूल डि नंदिनी डेअरी या परराज्यातील दूध ब्रॅण्डधारकांनी स्थानिक दूध ब्रॅण्डधारकांना चांगले आव्हान निर्माण केलेले आहे. कारण अशा काही दूध ब्रॅण्डधारकांची डिलर दर ते ग्राहक दरातील तफावत प्रतिलिटरला 3 ते 4 रुपयांपेक्षा जास्त नसून हीच तफावत राज्यातील 90 टक्के दूध ब्रॅण्डधारकांकडून 10 ते 12 रुपयांपर्यंत ठेवली जात आहे. कारण दुग्ध उद्योगातील पाऊच पॅकिंगमधील दुधाची विक्री स्पर्धा तीव्र होत चालली आहे.

गायीच्या दुधाचा खरेदी दर वाढविल्याने शेतकर्‍यांसाठी हा निर्णय योग्यच आहे. मात्र, दुसरीकडे ग्राहकांवरही सतत बोजा वाढत आहे. गायीच्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाचा खरेदी दर आता प्रतिलिटरला 37 ते 38 रुपये तर विक्री दर 56 ते 58 रुपये झालेला आहे. तर 6.0 फॅट व 9 एसएनएफ गुणप्रतिच्या म्हैस दुधाची खरेदी 47.30 रुपये ते 49.50 रुपये दराने होत आहे. तर विक्रीचा दर 70 ते 72 रुपये आहे.

याबाबत राज्य दूध उत्पादक प्रक्रिया व व्यावसायिक कल्याणकारी संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले, गायीच्या दुधाची खरेदी लिटरला 25 रुपयांवरून 37 रुपये (12 रुपये वाढ) तर विक्री 48 वरून 56 रुपयांवर (8 रुपये वाढ) पोहोचली आहे. यामध्ये पाऊच पॅकिंग उत्पादकांकडून स्पर्धेमुळे डिलरच्या अंतर्गत दरात पाच रुपयांपर्यंत वाढ झाली. मात्र, ग्राहकांवर थेट आठ रुपयांचा बोजा पडला. यामध्ये दुधाचे डिलर ते एमआरपीमधील असलेले दराची तफावत कमी करून स्पर्धेच्या काळात ग्राहकांवर बोजा कमी करण्याची आवश्यकता आहे. दुधाचा उत्तम दर्जा, आकर्षक पॅकिंग आणि ग्राहकांना आपल्या ब्रॅण्डबरोबर टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक आहे.

दुधाच्या खरेदी दरापेक्षा विक्री दर विचारात घेतला तर प्रतिलिटरला 18 ते 19 रुपयांचा फरक आहे. यामध्ये पाऊच पॅकिंग उत्पादकांकडून डिलरला दिलेला दर आणि प्रत्यक्ष ग्राहकांना खरेदी कराव्या लागणार्‍या दुधाचे दर हे वाजवी पातळीवर ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी डिलरसाठीच्या दूध विक्री कमिशनची रक्कम कमी करून ग्राहकांवरील बोजा कमी करण्याची गरज आहे. तरच स्थानिक दुधाचे ब्रॅण्ड स्पर्धेत तग धरू शकतील, असेही ते म्हणाले.

Back to top button