खोर : वन्यप्राण्यांच्या मदतीला धावला ’एक मित्र एक वृक्ष ग्रुप’

खोर : वन्यप्राण्यांच्या मदतीला धावला ’एक मित्र एक वृक्ष ग्रुप’

रामदास डोंबे

खोर(ता. दौंड): कडक उन्हाळ्याची चाहूल ही फेब्रुवारीच्या मध्यातच लागली. रणरणते ऊन…डोंगरमाथ्यावरील वाळलेले गवत…पाण्याची टंचाई आणि पाण्यासाठी वन्यप्राण्यांची वणवण भटकंती अशा विदारक व भयानक परिस्थितीला सुरुवात झाली आहे. अशा प्राण्यांच्या मदतीला दौंड तालुक्यातील 'एक मित्र – एक वृक्ष ग्रुप' सरसावला आहे.

दौंड तालुक्यात अनेक ठिकाणी अभयारण्य परिसर आहे. या अभयारण्यात अनेक लहान-मोठे ससे, लांडगे, हरीण, कोल्हे असे प्राणी वास्तव करीत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीदेखील येथे आढळून येतात; मात्र अभयारण्य परिसरात पाण्याची कुठल्याच प्रकारची सोय नाही. सामाजिक उपक्रमांची जाणीव असलेला दौंड तालुक्यातील 'एक मित्र एक वृक्ष ग्रुप' वन्यप्राण्यांच्या मदतीला धावून आला आहे.

या ग्रुपच्या 150 सदस्यांनी निसर्गाच्या जतन व संवर्धनासाठी वृक्षारोपण केले आहे. वृक्षारोपण केलेल्या परिसरात सिमेंटचे पाणवठे त्यांनी तयार केले आहेत. हे पानवठे बशीच्या आकाराचे असून, यामध्ये साधारणत: 700 ते 1000 लिटर पाणीसाठा होतो. या ग्रुपने 5 पाणवठे तयार केले आहेत. त्यातील पहिला पाणवठा आईचं बन वाखारी येथे स्व. नारायण फासगे यांच्या स्मरणार्थ कला शिक्षक सुभाष फासगे यांनी बांधून दिला. दुसरा पानवठा आईचं बन देलवडी येथे एक मित्र एक वृक्षाचे अध्यक्ष प्रशांत मुथा यांनी वाढदिवसानिमित्त दिला.

तिसरा पाणवठा निसर्गप्रेमी पक्षांचे ज्यूस बार उंडवडी येथे नाशिक येथील सागर वाटमकर यांनी दिला आहे. चौथा पाणवठा आईचं बन पडवी येथे स्व. अनिलकुमार रघुवीरप्रसाद अगरवाल यांच्या स्मरणार्थ अग्रवाल परिवार यांनी दिला आहे तर पाचवा पाणवठा मध्य प्रदेश येथील उद्योगपती अरुण कटारिया यांनी त्यांची मुलगी शनया हिच्या वाढदिवसानिमित्त दिला आहे. अजून पाच ते सहा पाणवठे तयार करण्याचा या ग्रुपचा मानस असल्याचा ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत मुथा यांनी सांगितले.

उन्हाळ्यामध्ये नैसर्गकि पाण्याचे स्रोत आटतात. पक्षी व प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होते. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करताना मोठ्या प्रमाणात प्राणी, पक्षी यांचा रस्ता अपघातात मृत्यू होतो. अशावेळी कृत्रिम पाणवठे उपयोगी ठरतील. छोटे पाणवठे सर्वत्र तयार केले पाहिजे. पक्षी व वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय ठिकठिकाणी केली पाहिजे.
                                      प्रशांत मुथा, अध्यक्ष, एक मित्र एक वृक्ष ग्रुप

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news