पुणे : राजगड, तोरणा किल्ल्यांवर पर्यटकांसाठी वॉकिंग प्लाझा

पुणे : राजगड, तोरणा किल्ल्यांवर पर्यटकांसाठी वॉकिंग प्लाझा

प्रसाद जगताप

पुणे : स्वराज्याचे तोरण बांधलेला किल्ला तोरणागड आणि स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडाचा आता सर्वांगीण विकास होणार आहे. या आराखड्यानुसार आगामी काळात येथे पर्यटकांसाठी किल्ल्यावर वॉकिंग प्लाझा, बाग-बगीच्या, स्वच्छतागृह, आरोग्य सुविधांसह अन्य पायाभूत सुविधा आणि किल्ल्यांची डागडुजी करण्यात येणार आहे. पुण्यातील ऐतिहासिक वेल्हे तालुक्याला मोठा इतिहास आहे.

मात्र, अनेक वर्षांपासून हा भाग मागास म्हणूनच ओळखला जातो. परंतु, राजगड आणि तोरणागडाच्या विकासामुळे याची आता नव्याने ओळख निर्माण होणार आहे. राज्याच्या पुरातत्त्व विभागाकडून किल्ले रायगडप्रमाणेच राजगड आणि तोरणागडाचा विकास करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार किल्ले राजगड आणि तोरणागडाचा सर्वांगीण विकास आराखडा करण्यात येत आहे.

स्थानिकांच्या शासनाकडून या आहेत अपेक्षा

  • पायथ्याला पर्यटकांच्या गाड्या पार्किंगची व्यवस्था
  • किल्ल्यावर स्वच्छतागृह ? माहितीदर्शक फलक बसवावेत
  • किल्ल्याच्या बुरुजांची, तटबंदीची दुरुस्ती करावी
  • सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी
  • भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून द्यावा

ऐतिहासिकता जपली जाणार
महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व विभागाकडून या दोन ऐतिहासिक किल्ल्यांचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. पुढच्याच महिन्याच्या म्हणचेच मार्च 2023 अखेरपर्यंत हा आराखडा तयार होणार आहे. त्यात किल्ल्याच्या ऐतिहासिकतेला कोणताही धक्का बसविला जाणार नाही, असे पुरातत्त्व अधिकार्‍यांनी सांगितले.

इतर किल्ल्यांच्या तुलनेत राजगड, तोरणागडाचा विकास करण्यास शासनाला उशीरच झालेला आहे. राजगड आणि तोरणागड हे स्वराज्याचा इतिहास घडविणारे किल्ले आहेत. या किल्ल्यांवर असुविधा आणि पर्यटकांना किल्ले चढताना असुरक्षित वाटते. आता प्रशासनाने विकास करायचा ठरविलाच आहे तर शासनानेही याकडे आस्थेने पाहात दोन्ही किल्ल्यांचा तातडीने विकास करावा.
                                  – राहुल नलावडे, शिवचरित्र व दुर्गअभ्यासक

राजगड आणि तोरणागडाचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत हा आराखडा पूर्ण होईल. त्यानंतर तो शासनासमोर ठेवण्यात येणार असून, त्याला मंजुरी मिळाल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल.

                  – डॉ. विलास वाहणे, सहायक संचालक, राज्य पुरातत्त्व विभाग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news