खडकवासला : संपामुळे अंगणवाड्यांतील बालकांचे हाल | पुढारी

खडकवासला : संपामुळे अंगणवाड्यांतील बालकांचे हाल

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : मानधनात वाढ व इतर मागण्यांसाठी सोमवारपासून (दि.20) सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या राज्यव्यापी बेमुदत संपाचा मोठा फटका खडकवासला, सिंहगडसह, पानशेत वेल्हे भागातील अंगणवाड्यांतील कष्टकर्‍यांच्या बालकांना बसला आहे.

संपामुळे तीन दिवसांपासून अंगणवाड्या उघडल्या नाहीत. त्यामुळे दररोज सकाळी नाष्टा,सकस आहाराच्या आशेने अंगणवाडीत येणार्‍या आदिवासी,गोर गरीब, कष्टकर्‍यांच्या चिमुरड्यांवर हालाखीची वेळ आली आहे. गावोगावी तसेच तालुक्याच्या ठिकाणी मोर्चा काढल्या नंतर अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी जिल्हा परिषद मुख्यालयावर मोर्चा काढून मागण्यांबाबत साकडे घातले. खडकवासला येथील मोर्चात शंभराहून अधिक अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाले होते. माजी सरपंच सौरभ मते यांना निवेदन देण्यात आले.

मागण्या मान्य न झाल्यास 28 फेब—ुवारी रोजी मुंबईत आझाद मैदानावर सत्याग्रह करण्याचा निर्धार अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे. बेमुदत संपामुळे अंगणवाड्या जादा दिवस बंद राहिल्यास कुपोषण स्तरावरील बालकांसह सर्व बालकांचे सकस आहारा अभावी मोठ्या प्रमाणात कुपोषण होण्याची शक्यता आहे. बेमुदत संपामुळे बालकांसाठी सकस आहाराची पर्यायी व्यवस्था करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. या भागात दोनशेहून अधिक अंगणवाड्या आहेत.

राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका,मदतनीसांनी तालुका पंचायत समिती कार्यालयावर तसेच गावोगाव मोर्चा काढला. कृती समितीच्या पानशेत विभाग सचिव साधना जगताप म्हणाल्या, की वर्षानुवर्षे बालकांना तुटपुंज्या तरतुदीत नियमित सकस आहार दिला जात आहे. मात्र इंधन भत्ता व इतर खर्चात वाढ नाही.

अनेक अंगणवाड्यांचे भाडेही मिळत नाही. संपामुळ कुपोषणाची फारच चिंता वाटत असली तरी आम्ही लेकरांना सदृढ निरोगी राहण्यासाठी दिवसरात्र राबतो. अपुर्‍या मानधनामुळे आमच्या कुटुंबाचे कुपोषण होते त्याची कोणालाही चिंता नाही. शहरा लगतच्या शिवणे,कोंढवे धावडे आदी ठिकाणी तसेच सिंहगड भागातील खानापूर,डोणजे सह मुख्य रस्त्यावरील मोठ्या लोकसंख्येच्या गावातील अंगणवाड्यात मोठ्या प्रमाणात मजूर, कष्टकर्‍यांची बालके आहेत.

खडकवासलाचे माजी सरपंच सौरभ मते म्हणाले, की बेमुदत संपामुळे अंगणवाड्या बंद असल्याने बालकांचा सकस आहार बंद झाला आहे. कष्टकर्‍यांच्या बालकांचा नाष्टा, जेवण बंद झाले आहे . मजुरी करणार्‍या आदीवासींसह बालकांची गैरसोय होत आहे.

बालकांच्या अंगणवाड्यांभोवती घिरट्या
अंगणवाडीत दररोज सकाळी मिळणारा नाष्टा व दुपारचे जेवण असा सकस आहार बंद झाला आहे.खिचडी,लापशी, नाष्टा अशा सकस आहाराची सवय झालेली बालके बंद असलेल्या अंगणवाडीच्या भोवती पालकांना घेऊन घिरट्या घालत आहेत.

…म्हणून पर्यायी व्यवस्था नाही
जिल्हा परिषदेचे बालविकास प्रकल्प विभागाचे प्रमुख जामसिंग गिरासे म्हणाले, की अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या संपावर तोडगा लवकरच निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्यावर निर्णय झाला नाही. वेल्हे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंकज शेळके म्हणाले, की अंगणवाड्यातील बालकांना सकस आहाराची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना बालविकास विभागाला करण्यात आली आहे.

Back to top button