कसब्यातील जुन्या वाड्यांचा पुनर्विकास करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुढारी

कसब्यातील जुन्या वाड्यांचा पुनर्विकास करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसब्यातील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, निवडणुकीनंतर याबाबत नवीन नियमावली जाहीर केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी गुरुवारी रॅली काढली. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रासने आदींसह अनेक नेते सहभागी झाले होते. रॅलीचे रुपांतर मंडई येथे सभेत झाले.

फडणवीस म्हणाले, कसबा हा खासदार गिरीश बापट यांनी बांधलेला भाजपचा मतदारसंघ आहे. बापट यांनी आजारी असतानाही एका बैठकीला हजेरी लावत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हा समाज नाराज आहे, तो समाज नाराज आहे, अशा अनेक वावड्या विरोधकांनी उठवल्या. मात्र, हा मतदारसंघ हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे येथे भाजपचाच विजय होईल.

शरद पवार यांच्या मेळाव्यात त्याचे नेते जातीयवादी टिपण्णी करतात, मेलेल्या लोकांना मतदानासाठी आणा म्हणतात. त्यामुळे कसब्यातील लढाई ही 370 कलम हटवले म्हणून छाती पिटणार्‍यांविरोधात राष्ट्रीय विचाराच्या लोकांची आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निवडून येणारच नाही. जर चुकून आला तर त्याला मतदारांनी तुमची पुण्येश्वर महादेव संदर्भात काय भूमिका आहे,

असा प्रश्न विचारावा. ही निवडणूक केवळ धंगेकर विरुद्ध रासने नाही तर वैचारिक लढाई आहे. मतदारसंघातील 18 पगड जाती-जमाती भाजपच्या मागे खंबीरपणे उभ्या आहेत. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे कसब्याचा आमदारही भाजपचाच असायला हवा. महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून आम्ही पुण्याचा चेहरामोहरा बदलला. काही दिवसांत मेट्रोचे काम पूर्ण होईल, शहरातील नद्या सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 200 कोटी रुपयांचा निधी दिला. देशात सर्वाधिक ई-बस पुणे शहरात आहेत.

…या मार्गांनी गेली रॅली
नदीपात्रातील भिडे पूल येथे सुरू झालेली रॅली नारायण पेठ, केसरीवाडा, रमणबाग प्रशाला चौक, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, पेरूगेट पोलिस चौकी, टिळक रस्ता, एस.पी. कॉलेज चौक, खजिना विहीर, उद्यान प्रसाद कार्यालय, महाराणा प्रताप उद्यान, बाजीराव रस्ता, शनिपार चौक येथून महात्मा फुले मंडई येथे समाप्त झाली.

Back to top button