पुणे : कसबा, चिंचवडमध्ये राजकीय वातावरण तापले; प्रचाराच्या तोफा आज थंडावणार | पुढारी

पुणे : कसबा, चिंचवडमध्ये राजकीय वातावरण तापले; प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

पुणे/पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांच्या निमित्ताने भाजप आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून तळ ठोकत सभा, मेळावे, रॅलींवर भर दिल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, उद्या शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असून, त्यानंतर दोन दिवस उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून पडद्यामागे हालचालींना वेग येणार आहे. रविवारी मतदार होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसबा पेठ मतदारसंघात भाजपच्या उमेदवारासोबत शुक्रवारी रॅली काढून प्रचाराची सांगता करणार आहेत, तर महाविकास आघाडीही सांगतेच्या निमित्ताने भव्य रॅली काढून मतदारांशी संपर्क साधणार आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मोठी रॅली काढून सभा घेतली. त्यांच्या सोबतच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी सभा, मेळावे घेतले.

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी शिवसेनेचे (ठाकरे गट) युवानेते आदित्य ठाकरे यांच्या आजच्या रॅलीला व सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मेळावे घेतले, तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बैठका, सभा घेत कसब्यावर लक्ष केंद्रित केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे तळ ठोकला होता. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी सभा व मेळावे घेत प्रचार केल्याने, राजकीय वातावरण तापले आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार गेले 17 दिवस शिंगेला पोहोचला होता. निवडणूक रिंगणात तब्बल 28 उमेदवार आहेत. निवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे व अपक्ष राहुल कलाटे या प्रमुख तीन उमेदवारांमध्ये तिरंगी लढत आहे. प्रचारासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेते, आमदार, खासदार व पदाधिकार्यांना मैदानात उतविण्यात आले. पदयात्रा, रॅली, कोपरा सभा, बैठका, जाहीर सभा या माध्यमातून मतदारसंघ संघातील सांगवी ते किवळे, मामुर्डीपर्यंतचा सर्वच भाग ढवळून निघाला. निवडणुकीसाठी रविवारी (दि. 26) मतदान होणार आहे. त्यापूर्वी शुक्रवारी सायंकाळी प्रचार बंद होणार आहे.

Back to top button