पिंपरी : ड्रेनेज लाईनच्या कामास विलंब; ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी | पुढारी

पिंपरी : ड्रेनेज लाईनच्या कामास विलंब; ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : अमृत योजनेअंतर्गत निगडी विभागातील से.22 मधील ड्रेनेज लाईनच्या कामास मंजुरी मिळाली. मात्र, मंजुरीनंतर काम सुरू न करता नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार ठेकेदाराकडून सुरू आहे. त्यामुळे या ठेकेदारास काळ्या यादीत टाकावी, अशी मागणी होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील अमृत योजनेंतर्गत सुरू असलेले काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्याचे तात्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला अमृत योजनेअंतर्गत येणारी कामे लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. परंतु याचे ठेकेदारास गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. तसेच महापालिकेचा ड्रेनेज विभाग या ठेकेदारास पाठीशी घालत आहे. ठेकेदारावर प्रशासनाचा वचक राहिलेला नाही.

त्यामुळे स्वतः आयुक्तांनी यात लक्ष घालून दोषी असणारे ड्रेनेज विभागातील सह शहर अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच ठेकेदारावर कडक कारवाई करून त्याने भरलेली अनामत रक्कम, सुरक्षा रक्कम व बयाना रक्कम जप्त करावी तसेच ड्रेनेज लाईनचे काम तात्काळ पुर्ण करण्या संदर्भात संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत, अन्यथा नाईलाजास्तव तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिपक खैरनार यांनी दिला आहे.

Back to top button