पुणे : बारामती उपविभागात 107 प्रकल्प पूर्ण | पुढारी

पुणे : बारामती उपविभागात 107 प्रकल्प पूर्ण

बारामती : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन या योजनेत बारामती उपविभागात आतापर्यंत 107 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. नवीन 185 प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत हा उपक्रम राबवला जातो. त्यासाठी बारामती तालुक्यात 115, दौंड तालुक्यात 239, इंदापूर तालुक्यात 143 व पुरंदर तालुक्यात 86 असे एकूण 583 अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 107 अन्न प्रक्रिया प्रकल्प पूर्ण झाले आहेत. 185 प्रकल्प मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत, असेही सांगण्यात आले.

योजनेचे निकष बदलले असून, अन्न प्रक्रियेसंदर्भातील इतर उद्योगांनाही आता अनुदान मिळणार आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यास इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. योजनेंतर्गत पात्र असणार्‍या प्रकल्पास खर्चाच्या 35 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सहभाग घेता येतो. उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कार्यरत शेतकरी, उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसाहाय्यता गट व उत्पादक सहकारी संस्था यांच्या नवीन उद्योगांना प्राधान्य दिले जाते. प्रकल्पाच्या क्षमतेनुसार वैयक्तिक लाभार्थ्यास 10 लाख रुपये व उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसाहाय्यता गट व उत्पादक सहकारी संस्था यांना 3 कोटींपर्यंत अनुदान देय आहे.

या उद्योगांचा असेल समावेश
बेकरी, केळी चिप्स, बिस्किट, पोहा, काजू प्रक्रिया उद्योग, ब्रेड /टोस्ट, केक, चॉकलेट, कोकोनट मिल्क पावडर, कस्टर्ड पावडर, दलीया, डाळमिल, एनर्जी ड्रिंक, पिठाची गिरणी, फ्रेंच फ्राय, फ्रूट ज्युस, अद्रक-लसूण पेस्ट, ग्रेप वाइन, शेंगदाणा/सोयाबीन/सूर्यफूल/करडी लाकडी तेलघाणा/यांत्रिक, हिंग, मध, बर्फाचे तुकडे, आईस्क्रीम कोन, आयोडीनयुक्त मीठ, जॅम व जेली, लिंबू सरबत इत्यादी उद्योगांकरिता अनुदान उपलब्ध आहे. यापैकी कोणताही उद्योग आधीच अस्तित्वात व वापरात असेल. तर त्याच्या विस्तारीकरणासाठी अर्ज करता येईल. विस्तारीकरण पूर्ण केल्यानंतर अनुदान मिळेल.

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतमालाचे मूल्यवर्धन होऊन शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकरी, उत्पादक गट कंपनी, संस्था, स्वयंसाहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था यांनी योजनेत सहभाग नोंदवून लाभ घ्यावा. अर्ज व अन्य माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
                          – वैभव तांबे, उपविभागीय कृषी अधिकारी, बारामती.

Back to top button