पिंपरी : धनुष्यबाण उंचावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शक्तिप्रदर्शन | पुढारी

पिंपरी : धनुष्यबाण उंचावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शक्तिप्रदर्शन

पिंपरी : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर प्रथमच चिंचवड विधानसभा निवडणूक रणधुमाळीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी (दि. 22) पिंपरी-चिंचवड शहरात आले. त्यांनी वाकड येथील उत्कर्ष चौकात धनुष्यबाण उंचावून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. चिंचवड विधानसभा निवडणुकीतील युतीच्या उमेदवाराच्या प्रचारानिमित्त त्यांचा ‘रोड शो’ झाला. त्या वेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांनी त्यांच्या हातात धनुष्यबाण दिल्यानंतर त्यांनी तो उंचावला.

एकप्रकारे शिवसेना पक्षाची बांधणी करण्याच्या दृष्टीने आपण तयारी सुरू केली असल्याचा संदेश दिला. खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पिंपरी-चिंचवडमधील दौर्‍यानिमित्त थेरगाव परिसरात आवश्यक तयारी केली होती. कार्यकर्ते भगव्या टोप्या तर महिला फेटे घालून ‘रोड शो’ मध्ये सहभागी झाले होते. तसेच, शिंदे यांचे ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. नागरिक ठिकठिकाणी मोबाईलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छबी टिपत होते.

Back to top button