

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दृष्टिहीन विद्यार्थिनी अनिताला एमएमची परीक्षा देण्यासाठी अभ्यासक्रमातील ऑडिओ बुक्सची गरज होती. तिला यशोवाणी ग्रुपबद्दल माहिती मिळाली अन् तिला अभ्यासक्रमातील पुस्तकांचे ऑडिओ बुक्स विनामूल्य उपलब्ध झाले. अनिता हिच्या प्रमाणे कित्येक दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी यशोवाणी ग्रुप आधार बनला आहे.
अभ्यासक्रमाची पुस्तके, नोट्स अन् इतर विषयांवरील पुस्तके ऑडिओ बुक्स स्वरूपात दृष्टिहीन विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी ग्रुप काम करीत आहे. याचा फायदा अनेक दृष्टिहीन विद्यार्थ्यांना होत आहे. ग्रुपमधील सुमारे 400 प्रतिनिधी आपल्या आवाजामध्ये हे ऑडिओ बुक्स रेकॉर्ड करीत असून, हे ऑडिओ बुक्स विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅप आणि इतर माध्यमातून उपलब्ध करून दिले जात आहे. दृष्टिहीन विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना उत्तमरीत्या अभ्यास करता यावा आणि त्यांना अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तके, नोट्स उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हा ग्रुप कार्यरत आहे.
ग्रुपमधील प्रतिनिधी दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी हे ऑडिओ बुक्स विनामूल्य रेकॉर्ड करून देत असून, हे ऑडिओ ऐकून विद्यार्थी अभ्यास करीत आहेत. ग्रुपच्या संस्थापिका प्राची गुर्जर म्हणाल्या की, आम्ही वेगवेगळे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत. विद्यार्थी या ग्रुपवर त्यांना हव्या असलेल्या पुस्तकांची नावे सांगतात, नोट्स पाठवितात; त्याप्रमाणे आम्ही त्यांना हवे ते पुस्तक ऑडिओ स्वरूपात रेकॉर्ड करून पाठवतो. पुस्तके आमचे प्रतिनिधी स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड करतात आणि त्यांना ते व्हॉट्सअॅप ग्रुपवर किंवा गुगल ड्राइव्ह लिंकवर उपलब्ध करून दिले जाते. सध्या विद्यार्थ्यांना अशा ऑडिओ बुक्सची खूप गरज असून, त्यांना याचा फायदाही होत आहे. ऑडिओ बुक्ससह विद्यार्थ्यांना रोजच्या वर्तमानपत्रातील अग्रलेख आणि लेखकही ऑडिओ स्वरूपात व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवितो. फेसबुक पेजवरही आम्ही पुस्तकांच्या ऑडिओ बुक्सची नावेही पोस्ट करतो. त्यातून त्यांना याविषयी माहिती मिळते.
मागणीनुसार करून दिले जाते बुक्स
ग्रुपमधील प्रतिनिधी ऑडिओ बुक्स रेकॉर्ड करून देतात. विद्यार्थ्यांना मागणीप्रमाणे हे बुक्स पेनड्राइव्ह, गुगल लिंकवर उपलब्ध करून दिले जाते. पुण्यासह लातूर, बारामती, नागपूर, औरंगाबाद आदी शहरांतील विद्यार्थ्यांना हे ऑडिओ बुक्स पाठविले जात आहेत. तसेच, देशातील इतर राज्यांतील विद्यार्थ्यांनाही ऑडिओ बुक्स पाठविले जाते.