पुणे : महावितरणचे कार्यालय अडगळीत

पुणे : महावितरणचे कार्यालय अडगळीत
Published on
Updated on

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  गैरसोयीच्या ठिकाणी असलेल्या महावितरणच्या कार्यालयामुळे धायरी परिसरातील हजारो ग्राहक त्रस्त झाले आहेत. एका ठिकाणी बिल भरल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्यासाठी धायरीकरांना दुसर्‍या ठिकाणी पाच-सहा किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी बेनकर वस्ती भागात एकाच ठिकाणी महावितरणचे कार्यालय सुरू करून सर्व सुविधा उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. धायरी परिसरात सुमारे तीस हजारांहून अधिक वीजग्राहक आहेत. नर्‍हे-धायरी शीव रस्त्यावर परांजपे बांधकाम संकुलात वीज कंपनीने कार्यालय थाटले आहे. मात्र, या ठिकाणी ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता नाही. तसेच रिक्षा, बस अशी दळणवळणाची साधने, झेरॉक्स सुविधा नाहीत. तर मुख्य सिंहगड रस्त्यावरील सणस शाळेजवळील मधुकोष सोसायटीतील वीजबिल भरणा केंद्र गैरसोयीच्या ठिकाणी आहे. वीजग्राहकांच्या हलाखीकडे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते व धायरीचे माजी उपसरपंच धनंजय बेनकर, खडकवासला युवा आघाडीचे अध्यक्ष प्रथमेश बेलदरे यांनी लक्ष वेधले आहे.

आम आदमी पक्षाचे पुणे शहर संपर्क प्रभाकर कोंढाळकर म्हणाले, 'वीजपुरवठा खंडित केलेला मीटर बसविण्यासाठी एका ठिकाणी बिल भरून दुसर्‍या ठिकाणी अर्ज देणे आदी कामांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात.' गेल्या आठ दहा वर्षांत धायरी गावठाण, रायकरमळा, बेनकरमळा, महादेव मंदिर परिसर, अंबाईदरा भागांत लोकसंख्या चार-पाचपटीने वाढली आहे. या भागात प्रचंड प्रमाणात वीजग्राहक असताना त्यांच्या गैरसोयीकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे.

रहिवासी राजाभाऊ बेनकर म्हणाले, 'खंडित वीजपुरवठा सुरू करण्यासाठी नर्‍हे कार्यालयातून दंडाची पावती घेऊन पैसे धायरी फाट्यावरील कार्यालयात भरावे लागतात. नंतर पुन्हा बिल भरल्याची पावती घेऊन नर्‍हे कार्यालयात जावे लागते.' महावितरणने ग्राहकांची गैरसोय दूर न केल्यास येत्या 1 मार्चपासून सत्याग्रह आंदोलन सुरू करण्याचा इशारा प्रभाकर कोंढाळकर, प्रथमेश बेलदरे, सुनीता काळे, राहुल बेनकर, संदीप बेनकर आदींनी दिला आहे.

वेळेवर वीजबिले मिळत नाही. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर बिल भरून तातडीने वीजपुरवठा सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांना धावपळ करावी लागत आहे. धायरी रायकर मळा, अंबाईदरा अशा ठिकाणांपासून पाच किलोमीटर अंतरावर धायरी फाटा आहे. धायरी फाटा व नर्‍हे येथील दोन्ही कार्यालये गैरसोईची आहेत.'
                              – धनंजय बेनकर, कार्यकर्ते, आम आदमी पार्टी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news