पुणे : अभियंत्याचा आठ जणांना गंडा | पुढारी

पुणे : अभियंत्याचा आठ जणांना गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने एका सॉफ्टवेअर अभियंत्याने आठ जणांना 11 लाख 30 हजारांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणुकीचा आकडा मोठा असून, अद्यापपर्यंत दहा ते पंधरा जणांनी अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे. याप्रकरणी, श्रीकांत बालाजी बिरादार (वय 30, रा. लिलीयन अपार्टमेंट, वाकड चौक, वाकड) याला अटक केली आहे. याबाबत प्रदीप माणिक भुजबळ (वय 28, रा. लादवड, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बिरादार याच्यावर फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले, की आरोपी बिरादारचे सॉफ्टवेअरचे शिक्षण झाले आहे. त्याने हायस्ट्रीट बाणेर-बालेवाडी येथे फ्रेशर जॉब हंट नावाची नोकरी मिळवून देणारी कंपनी स्थापन केली होती. त्याद्वारे त्याने काही तरुणांना विविध कंपन्यांत चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देतो, असे सांगून पैसे घेतले. त्याने अशाप्रकारे दहा ते पंधरा जणांना फसविले आहे. मात्र, अद्याप आठ जणांनी फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्याने तरुणांकडून 11 लाख 30 हजार रुपये घेतले. त्यानंतर ऑफिस गुंडाळून तो फरार झाला होता. दरम्यान, फिर्यादी व त्यांच्या साथीदारांनीच त्याला शोधून काढून पोलिस चौकीत हजर केले. त्यानंतर गुन्हा दाखल करून बिराजदार याला अटक करण्यात आली आहे.

Back to top button