पुणे : एफसी रोडवर फिल्मी स्टाईल हाणामारी | पुढारी

पुणे : एफसी रोडवर फिल्मी स्टाईल हाणामारी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  गर्दीने गजबजलेल्या एफसी रोडवर ग्राहकांवरून दोन दुकानांतील नोकर भिडले. एकमेकांना फिल्मी स्टाईलने मारहाण करीत, मोठ्याने आरडा-ओरडा निर्माण करून राडा घातला. दरम्यान, हा प्रकार निदर्शनास येताच डेक्कन पोलिस ठाण्याचे बीट मार्शल तुषार आल्हाट व विशाल साडेकर यांनी मारहाण करणार्‍याला लाठीचा प्रसाद देत पकडले. याप्रकरणी, डेक्कन पोलिसांनी महेश मारुती नायक (वय 24, रा. अण्णा भाऊ साठे चौक, वारजे), सूरज श्रीकांत कालगुडे (वय 21, रा. जनवाडी), अमित नीलेश देशपांडे (वय 26, रा. नारायण पेठ), विशाल नरेश उकिर्डे (वय 21, रा. तळजाई रोड, पद्मावती) या चौघांना अटक केली आहे. तर, इतर पाच जणांसह 9 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस नाईक तुषार अल्हाट यांनी फिर्याद दिली आहे.

हा प्रकार मंगळवारी (दि.21) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास केसरीया लेन एफसी रोड डेक्कन येथील सार्वजनिक फूटपाथवर घडला आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार यांनी सांगितले, की केसरीया लेन येथील दुकानात येणार्‍या ग्राहकांवरून तेथील कामगारांत यापूर्वीदेखील वाद झाले होते. त्यांना याबाबत समज देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर मंगळवारी दुपारी ग्राहकांवरून दोन दुकानांतील कामगारांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. हा प्रकार घडला त्या वेळी तेथून गस्तीवरील बीट मार्शल अल्हाट व साडेकर निघाले होते. अचानक नागरिक रस्त्यावर धावत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तेथे धाव घेतली. त्या वेळी काही व्यक्ती एकमेकांना मारहाण करीत असताना दिसून आल्या. त्यातील एकाला दोघांनी पकडून ठेवले. पोलिस आल्याचे पाहून इतरांनी पळ काढला. आत्तापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Back to top button