पुणे : रेल्वेच्या पुणे स्थानकावर चेन पुलिंग (डब्यातली साखळी ओढणे) च्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून, गेल्या आठवड्यात अशा 42 घटना घडल्या. याचा 42 रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन चेन ओढणार्यांवर कडक कारवाई करणार आहे. पुणे रेल्वे स्थानकावर उशिरा येणार्या प्रवाशांमुळे डब्यातली साखळी ओढण्याचे काम सातत्याने सुरू आहे. रेल्वे प्रशासन अशा प्रवाशांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करत आहे. परंतु, तरीदेखील चेन ओढून रेल्वे गाडी थांबविणार्या प्रवाशांमध्ये कमी होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गाड्यांना फटका बसत आहे. प्रवासी रेल्वे गाड्यांना उशीर होत आहे. त्यामुळे याचा थेट फटका रेल्वेच्या उत्पन्नावर आणि इतर प्रवाशांना बसत आहे.
…तर 8 ते 10 मिनिटांचा उशीर होतो
पुणे स्थानकावरून सुटणार्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांबाबत हा प्रकार घडत आहे. एकदा साखळी ओढली तर एका रेल्वेला किमान 8 ते 10 मिनिटांचा उशीर होतो. एका रेल्वेला उशीर झाला तर त्याच्या पाठीमागे येणार्या आणखी रेल्वेलादेखील त्याचा फटका बसतो. आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांची गस्त असली. तरी प्रवासी त्यांना न जुमानता साखळी ओढून रेल्वे थांबवत आहेत. मागील 20 दिवसांत साखळी ओढण्याच्या सुमारे 42 घटना घडल्या आहेत. याचा थेट फटका 47 प्रवासी गाड्यांना बसला आहे.