पुणे : नव्या टर्मिनलवरून लवकरच उड्डाण | पुढारी

पुणे : नव्या टर्मिनलवरून लवकरच उड्डाण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनलचे आता 75 टक्के काम पूर्ण झाले असून, सध्या येथे सीसीटीव्ही बसविणे, कन्व्हेअर बेल्ट बसविणे, सरकता जिना आणि इलेक्ट्रिकची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यावर येत्या दोन-तीन महिन्यांत हे नवे टर्मिनल प्रवाशांसाठी खुले होईल. लोहगाव येथील जुन्या विमानतळावर भविष्य काळात प्रवाशांचा वाढणारा अतिरिक्त बोजा लक्षात घेऊन, विमानतळ प्राधिकरणाने नवे टर्मिनल उभारण्याचे नियोजन केले होते. हे काम अंतिम टप्प्यात आले असून, तीन महिन्यांत पुणेकरांना नवीन टर्मिनलवरून प्रवास करता येणार आहे.

नव्या टर्मिनलवरील सुविधा
प्रवाशांना विमानापर्यंत पोचविणारे
5 नवीन मार्ग (पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज)
8 स्वयंचलित जिने (एस्केलेटर)
15 लिफ्ट 34 चेक-इन काउंटर
प्रवासी सामान वहन यंत्रणा

खाद्यपदार्थ आणि दुकानांसाठी 36 हजार चौरस फूट जागा
पिण्याच्या पाण्याची सुविधा, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था
सुसज्ज आणि अत्याधुनिक सुविधा असलेली प्रसाधनगृहे
अत्याधुनिक नवीन इंटीग्रेटेड टर्मिनल हे पूर्णत: वातानुकूलित
प्रवाशांचे मनोरंजन, व्यावसायिक वापरासाठी 15 हजार चौरस फूट जागा

पुणे विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाला 180 ते 190 विमानांचे उड्डाण होत असून, त्याद्वारे 30 हजारांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. या वाढलेल्या प्रवाशांच्या अतिरिक्त बोजाचा ताण जुन्या विमानतळ टर्मिनल आणि प्रशासकीय यंत्रणेवर पडत आहे. त्यामुळे हे विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Back to top button