

पुणे : 'शरद पवार यांना माहिती होते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर काँग्रेस, राष्ट्रवादी भुईसपाट होईल. त्यांना भाजपसोबत युती हवी होती; पण फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको होते', असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी येथे केला.
पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचार तोफा धडाडत आहेत. भाजपनेही त्यांच्या उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरू केला आहे.
बुधवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बावनकुळे यांनी शरद पवारांवर वरील टीका केली. ते पुढे म्हणाले, पवारांना राज्यात कोणीही मुख्यमंत्री चालतील; पण फडणवीस नको आहेत, हाच त्यांचा अजेंडा आहे. त्यामुळेच पवार हे फडणवीस यांना विरोध करायचे. फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून शरद पवार काही करू शकतात, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली. कसबा पोटनिवडणुकीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार चांगल्या मताने जिंकून येतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.