

पुणे : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण महाराष्ट्रात आठ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजप शिवसेना सरकारवर सर्वसामान्य माणसाचा विश्वास आहे, प्रेम आहे. हे सिद्ध करण्यासाठी कसबा विधानसभा मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळवायचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे भाजप-शिवसेना, आरपीआय महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते.
पाटील म्हणाले, आम्ही सर्वजण ताकदीने या निवडणुकीत उतरलो आहोत. कारण प्रत्येक गोष्ट नीट व ताकदीने करायची ही भाजपची कार्यपद्धती आहे. त्याप्रमाणे आम्ही सर्वजण प्रचार कार्यात सहभागी झालो आहोत. ही जागा सोपी आहे. भाजपची परंपरा आहे. ती प्रतिष्ठेची आहे. कारण परंपरागत जागा नुसती जिंकून उपयोगाची नाही, तर मोठ्या मताधिक्याने जिंकायची आहे. उद्योजक समीर पाटील यांनी संयोजन केलेल्या दुचाकी रॅलीत हजारो तरुण सहभागी झाले होते. गंज पेठेतील सावित्रीबाई फुले स्मारकासमोरून रॅलीची सुरुवात झाली. ठिकठिकाणी नागरिकांनी या रॅलीचे स्वागत केले.
राष्ट्रवादी- ठाकरे गटाला धक्का
कसबा निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष नितीन सर्जेराव जाधव तसेच हिंदू पद्मशाली समाजाचे नेते अनुपम वंगारी यांनी पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तर शिवसेना ठाकरे गटाचे कसबा पेठ समन्वयक सागर पेटाडे यांनी उमेदवार रासने यांना जाहीर पाठिंबा दिला.