पुणे : धार्मिक संस्थांकडून सोशल मीडियाचा सकारात्मक वापर | पुढारी

पुणे : धार्मिक संस्थांकडून सोशल मीडियाचा सकारात्मक वापर

सुवर्णा चव्हाण : 

पुणे : ऑनलाइन प्रार्थना, ऑनलाइन दर्शन अन् ऑनलाइन उपक्रम, या आणि अशा विविध माध्यमांतून धार्मिक संस्था आता सोशल मीडियाद्वारे समाजबांधवांना जोडण्याचे काम करीत आहेत. कोरोना काळात धार्मिक संस्थांनी सुरू केलेला सोशल मीडियाचा वापर आताही सुरू असून, धार्मिकस्थळांची माहिती देण्यासह विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केला जात असून, त्याला समाजबांधवांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च, बुद्धविहार आदी विविध धार्मिकस्थळांना सोशल मीडियाशी जोडले आहे. त्यामुळे आता काळाप्रमाणे बदलत धार्मिक संस्थाही हायटेक झाल्या आहेत.

अधिकृत संकेतस्थळासह व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदींच्या साह्याने धार्मिकस्थळाशी संबंधित असलेली संपूर्ण माहिती आणि कार्यक्रमांची माहिती समाजबांधवांना दिली जात आहे. विशेष म्हणजे, आताही धार्मिक संस्थांमार्फत ऑनलाइन प्रार्थना, दर्शन अन् कार्यक्रमांचा प्रयोग राबविला जात आहे. अनेकांसाठी तो सोयीचा ठरत आहे. समाजबांधवांचे खास व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपही तयार केले आहेत. त्याद्वारेही समाजबांधवांपर्यंत धार्मिकस्थळांमध्ये होणार्‍या सभांपासून ते उपक्रमांची माहिती दिली जात आहे. त्यासोबतच फेसबुक आणि यू-ट्यूब चॅनेलवरील व्हिडीओतूनही धार्मिक गोष्टींशी समाजबांधवांना जोडण्याचा प्रयत्न होत आहे. धार्मिक संस्थांनी त्यासाठी सोशल मीडिया टीम तयार केली असून, ते रोजचे अपडेट समाजबांधवांपर्यंत पोचविण्याचे काम करीत आहेत.

चतु:शृंगी देवस्थान ट्रस्टचे दिलीप अनगळ म्हणाले की, सामाजिक माध्यमाचा नक्कीच सकारात्मक वापर होत असून, त्याद्वारे घरबसल्या ऑनलाइन दर्शन समाजबांधवांना घेता येते. रोजच्या ऑनलाइन आरतीतही त्यांना सहभागी होता येत आहे. कोरोना काळात सोशल मीडियाचा वापर आम्ही सुरू केला होता, हा प्रयोग आताही सुरूच आहे.

काळाप्रमाणे बदलत आता धार्मिक संस्थाही सोशल मीडियाचा चांगला वापर करीत आहेत. आम्ही सोशल मीडियाच्या वापराद्वारे गुरुद्वारामधील माहिती पोचविण्यासह ऑनलाइन दर्शनाची सोय केली आहे. जगभरातील अनेक समाजबांधव यातून जोडले गेले आहेत.
                 – चरणजितसिंग सहानी, अध्यक्ष, गुरुद्वारा गुरू नानक दरबार (कॅम्प)

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे रोज पहाटे पाच वाजता विशेष प्रार्थनेच्या व्हिडीओची लिंक शेअर केली जाते. त्याद्वारे समाजबांधवांना घरबसल्या प्रार्थनेत सहभागी होता येते. चर्चमध्ये होणार्‍या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती ग्रुपद्वारेच आम्ही देतो.
                              – चंद्रशेखर जाधव, रेव्हरंड, ओल्डहॅम मेथडिस्ट मराठी चर्च

Back to top button