

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रस्त्यावरच लागणार्या पीएमपीच्या एकापेक्षा अधिक बसगाड्या… दुकानदार विक्रेत्यांच्या चारचाकी, दुचाकींचे अस्ताव्यस्त पार्किंग… पोलिसांनी मध्यवस्तीतून उचलून आणलेल्या दुचाकींचे पार्किंग… एका-मागे एक लागलेल्या टोईंग व्हॅन यामुळे वीर संताजी घोरपडे मार्ग अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात अडकला आहे. याकडे आरटीओ अधिकारी, वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. शनिवारवाड्यालगतच असलेल्या वीर संताजी घोरपडे मार्ग कुंभारवाडा, जुना बाजार येथून शाहीर अमर शेख चौकाकडे जातो.
सध्या या मार्गाकडे वाहतूक पोलिस आणि आरटीओ अधिकार्यांचेच दुर्लक्ष होत असल्यामुळे अनधिकृत पार्किंगचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, या मार्गाच्या सुरुवातीपासूनच ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांच्या नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या मार्गावर असलेला अनधिकृत आणि बेशिस्तपणे पार्क होणार्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वाहतूक पोलिसांनी वाहने काढावीत
वीर संताजी घोरपडे मार्गाच्या सुरुवातीलाच असलेल्या रस्त्याशेजारी वाहतूक पोलिस मध्यवस्तीतून उचलून आणलेल्या गाड्या पार्क करत आहेत. त्यासोबतच त्यांच्या दोन टोईंग व्हॅनदेखील येथे रस्त्यावरच उभ्या असतात. त्यामुळेसुध्दा येथे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रथमत: येथील त्यांचा तामझाम हलवून मोकळ्या जागेत स्थलांतरित करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
पीएमपीच्या बसमुळे अपघाताची शक्यता
पुढे सात-आठ पीएमपीच्या निळ्या बस रस्त्यावरच लागलेल्या असतात. त्यांच्या बेशिस्त पार्किंगमुळे येथे वाहतूक कोंडी होत असून, या बसमुळे अपघात होण्याचीदेखील शक्यता आहे.
जुन्या बाजार परिसरात बेशिस्त पार्किंग…
मनपाकडे जाणार्या चौकातून पुढे गेल्यावर शाहीर अमरशेख चौकाकडे जाताना मधेच जुना बाजार परिसर आहे. या परिसरातसुध्दा वाहनचालकांकडून बेशिस्तपणे वाहनांचे पार्किंग केले जाते. तसेच, रस्त्यालगतच दुकाने थाटली जातात. त्यामुळे येथे होणार्या कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकाच्या नाकीनऊ येत आहेत.