पुणे : भाजपच्या नेत्यांकडून आधीच पराभव मान्य : माजी मंत्री यशोमती ठाकूर | पुढारी

पुणे : भाजपच्या नेत्यांकडून आधीच पराभव मान्य : माजी मंत्री यशोमती ठाकूर

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर निवडून आले, तरी विकासनिधी मिळणार नाही. त्यामुळे आमच्या उमेदवाराला निवडून द्या, अशी वक्तव्ये भाजप नेत्यांकडून केली जात आहेत. यावरून भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या उमेदवाराचा पराभव मान्यच केला आहे, अशी टीका माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी केली. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधील महिलांनी तांबडी जोगेश्वरी चौकातून पदयात्रा काढली.

या वेळी माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, रुपाली ठोंबरे-पाटील, माजी आमदार दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, संगीता तिवारी, माजी क्रीडामंत्री सुनील केदार, आमदार संग्राम थोपटे, दीप्ती चवधरी, कमलताई व्यवहारे, लता राजगुरू, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, पल्लवी जावळे, नीता रजपूत, संगीता तिवारी, राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षा मृणाल वाणी, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा पूजा आनंद आदी उपस्थित होत्या. पदयात्रेदरम्यान, महागाई, बेरोजगारी अशा विविध मुद्द्यांवर टीका करणारे फलकही महिलांच्या हातात होते. तांबडी जोगेश्वरी-अप्पा बळवंत चौक- लोखंडे तालीम चौक – कॉसमॉस बँक चौक – रंगोली चौक – रमेश डाईंग – कवटी अड्डा – निंबाळकर तालीम – सुजाता मस्तानी – वंदे मातरम चौक – भिकारदास मारुती – महाराणा प्रताप बाग – बाजीराव रस्ता – नातूबाग – शनिपार चौक – नूमवि शाळा – अप्पा बळवंत चौक – सोमवंशी आर्य क्षत्रीय समाज कार्यालय या मार्गाने पदयात्रा काढण्यात आली. धंगेकर यांच्या कार्यालयात ठाकूर यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.

कोण काय म्हणाले?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार म्हणाले, ‘धंगेकर निवडून आले तर त्यांना विकासनिधी मिळणार नाही, हे चंद्रकांत पाटील यांचे विधान म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे. कसब्यातील जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.’ वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘कसब्यात दीर्घकाळ भाजपचे आमदार असून, पुणे महापालिकेत त्यांची सत्ता होती. मात्र, कसब्याच्या विकासासाठी ते निधी आणू शकले नाहीत.’

 

Back to top button