पुणे : ससूनमध्ये परवडणार्‍या दरात पेट सीटी स्कॅन | पुढारी

पुणे : ससूनमध्ये परवडणार्‍या दरात पेट सीटी स्कॅन

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कॅन्सरचे पूर्वनिदान करण्यासाठी ससून रुग्णालयात अद्ययावत पेट सीटी स्कॅनचे मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे. पेट स्कॅनसाठी यंत्रणा उभारणारे बी. जे. मेडिकल कॉलेज हे राज्यातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय ठरले आहे. रुग्णांना 5 ते 6 हजार रुपयांमध्ये पेट स्कॅन करून घेता येणार आहे. हाफकिन महामंडळाकडून या यंत्राची खरेदी करण्यात आली आहे. कर्करोगाचे निदान झालेल्या 90 टक्क्यांहून जास्त रुग्णांना पॉझिट्रॉन एमिशन टोपोग्राफी (पीईटी) स्कॅन करावा लागतो.

पीईटी स्कॅन करण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये 15 ते 20 हजार रुपये खर्च येतो. ससून रुग्णालयात सीजीएचएस दरांनुसार 5 ते 6 हजार रुपयांमध्ये स्कॅन करता येणार आहे. कर्करोग, हृदयरोग आणि मेंदूच्या विकारांसह विविध प्रकारचे ट्युमर ओळखण्यात पेट स्कॅनची मदत होत असल्याची माहिती समन्वयक डॉ. इब्राहिम अन्सारी यांनी दिली. रेडिऑलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. शेफाली पवार, इंटरव्हेन्शनल रेडिऑलॉजिस्ट डॉ. किरण नाईकनवरे आणि डॉ. अन्सारी काम पाहत आहेत.

ससून रुग्णालयात पेट सीटी आणि पेट सीटी विथ गॅमा कॅमेरा ही दोन्ही मशीन कार्यान्वित करण्यात आली आहेत. मशीनची किंमत अंदाजे 80 कोटी रुपये इतकी आहे. पेट सीटी स्कॅनची कार्यक्षमता तपासण्यासाठी 20 जणांवर प्रायोगिक तत्त्वावर तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर सामान्य रुग्णांसाठी मशीन खुले करण्यात आले. मशीनवर 45 ते 50 प्रकारचे स्कॅन करता येणे शक्य झाले आहे.

दररोज 10 ते 12 स्पेक्ट स्कॅन करता येणार
ससून रुग्णालयातील या दोन्ही मशीनच्या साहाय्याने दररोज 15 पेट स्कॅन आणि 10 ते 12 स्पेक्ट स्कॅन करता येऊ शकतात. मात्र, त्यासाठी लागणारा एफडीजी हा रेडिओअ‍ॅक्टिव्ह पदार्थ आधी मागवून ठेवणे आवश्यक असते. रुग्णांची आवश्यकता लक्षात घेऊन एकाच दिवशी 7 ते 8 स्कॅन केले जातात. आतापर्यंत 50 ते 55 रुग्णांचे स्कॅन करण्यात आले आहेत. रुग्ण बाहेरच्या डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन आल्यास त्यांना बाह्यरुग्ण विभागात दाखवून, वरिष्ठ डॉक्टरांच्या चिठ्ठीने तपासणीसाठी घेतले जाणार आहे.

पेट स्कॅन करण्यापूर्वी रुग्णाला ग्लुकोजसदृश रेडिओअ‍ॅक्टिव्ह पदार्थ (एफडीजी) दिला जातो. एफडीजीच्या साहाय्याने शरीरातील ट्युमर ओळखता येतात आणि सीटी स्कॅनच्या साहाय्याने त्याच्या इमेज मिळवल्या जातात. एफडीजी दिल्यानंतर आणि स्कॅनपूर्वी रुग्णाला 45 मिनिटे ’वेटिंग पीरियड’ दिला जातो. स्कॅनसाठी साधारण 15-20 मिनिटे लागतात. त्यानंतर 1 तास निरीक्षणाखाली ठेवले जाते. रुग्णाला संपूर्ण स्कॅनसाठी साधारणपणे 2 तास लागतात. थायरॉईड ग्लँड, यकृत, किडनी आदी अवयव किती कार्यक्षमतेने काम करत आहेत, यासाठी स्पेक्ट स्कॅन विथ गॅमा कॅमे-याचा उपयोग होतो.
                                               – डॉ. इब्राहिम अन्सारी, समन्वयक, पेट स्कॅन

 

खासगी रुग्णालयांमध्ये पेट स्कॅनसाठी 20 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. आर्थिक निम्नस्तरातील रुग्णांना इतके शुल्क भरणे शक्य नसते. यासाठी ससून रुग्णालयात पेट स्कॅन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
                             – डॉ. संजीव ठाकूर,अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय

Back to top button