पुणे : बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यास शिक्षकांचा नकार | पुढारी

पुणे : बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यास शिक्षकांचा नकार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने शासनाकडे प्रलंबित मागण्यांची निवेदने दिली, आंदोलनेही केली. शासनाने याबाबत लेखी आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे शिक्षक महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकांनी इंग्रजी विषयाच्या मुख्य नियामकांची राज्यस्तरीय बैठकही रद्द केली आहे. पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात आंदोलन करण्यात आले.

राज्य मंडळाकडून राज्यातील वरिष्ठ शिक्षकांचा समावेश असलेल्या मुख्य नियामकांच्या बैठकीचे आयोजन पुणे बोर्डात करण्यात आले होते. या बैठकीवरही शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. बारावीच्या परीक्षा मंगळवारपासून (दि.21) सुरू झाल्या आहेत. मात्र, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. शासनाने त्याबाबत अद्याप सकारात्मकता दाखवलेली नाही. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन संतप्त शिक्षकांनी बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार कायम ठेवला आहे.

…तरच बहिष्कार मागे!
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांना महासंघाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शासनाने बैठक घेऊन मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी केल्यासच उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार आंदोलन मागे घेण्यात येणार असल्याचे महासंघाकडून सांगण्यात आले आहे. महासंघाचे सचिव प्रा. संतोष फाजगे, उपाध्यक्ष सुनील पूर्णपात्रे, कार्याध्यक्ष अविनाश तळेकर, एम. एस. शहापुरे, तुकाराम साळुंखे, राहुल गोलांदे, अतुल पाटील, शांतीलाल खाडे आदींसह पदाधिकारी, शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेतला.

Back to top button