

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम जोमाने सुरू असून, सुमारे 1 कोटी 5 लाख 21 हजार 565 टन उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे. तर, 9.68 टक्के सरासरी उतार्यानुसार 1 कोटी 1 लाख 85 हजार 858 क्विंटल इतके साखरेचे उत्पादन तयार झालेले आहे. ऊस गाळप आणि साखर उत्पादनात बारामती अॅग्रो या खासगी कारखान्याने, तर श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 11.37 टक्क्यांइतका साखर उतारा मिळवून अग्रस्थान मिळविले आहे.
जिल्ह्यात सद्य:स्थितीत 11 आणि 6 खासगी मिळून एकूण 17 साखर कारखान्यांकडून ऊसगाळप सुरू आहे. बारामती अॅग्रो या खासगी साखर कारखान्याने 13 लाख 92 हजार 280 टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. तर, 8.54 टक्के उतार्यानुसार 11 लाख 88 हजार 450 क्विंटल साखरेचे उत्पादन तयार केलेले आहे. त्या खालोखाल माळेगाव सहकारीने 9 लाख 61 हजार 300 टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे.
त्यांचा साखर उतारा 9.94 टक्के असून, 9 लाख 55 हजार 800 क्विंटल साखरेचे उत्पादन तयार केले आहे. तर, ऊस गाळपात तिसर्या स्थानावर श्री सोमेश्वर सहकारी कारखाना असून, त्यांनी 9 लाख 40 हजार 657 टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. तर, 11.37 टक्क्यांइतका साखर उतारा मिळवून जिल्ह्यात उतार्यात दुसरे स्थान मिळविले आहे.
याबाबत साखर आयुक्तालयातील ऊस गाळप अहवालानुसार पुणे जिल्ह्यात गतवर्ष 2021-22 या गाळप हंगामात 16 साखर कारखान्यांकडून 1 कोटी 54 लाख 98 हजार 428 टन उसाचे गाळप पूर्ण केले होते. तर, चालूवर्ष 2022-23 मध्ये उसाचे सुमारे 1 कोटी 56 लाख 58 हजार 584 टनाइतके ऊस गाळप होण्याची अपेक्षा आहे. याचा विचार करता गतवर्षापेक्षा सुमारे 1 लाख 60 हजार 156 टनांनी ऊसगाळप अधिक होण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यात प्रत्यक्षात आजअखेरचे झालेले ऊस गाळप विचारात घेता अद्यापही 51 लाख 37 हजार 19 टनांइतके ऊस गाळप होणे बाकी आहे. सध्या कार्यरत 17 साखर कारखान्यांची दैनिक ऊसगाळप क्षमता 80 हजार 750 टनांइतकी आहे. याचा विचार करता एप्रिल महिनाअखेर पुणे जिल्ह्यातील उसाचे गाळप पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.